भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आवळल्या सात आरोपींच्या मुसक्या
By नितीन पंडित | Published: September 5, 2022 02:24 PM2022-09-05T14:24:58+5:302022-09-05T14:25:17+5:30
नारपोली पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे सहा गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश मिळविले आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी शहरातील पोलीस ठाणे हददीत सतर्क राहून गस्त घालण्याचा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मदन बल्लाळ यांच्यामार्गदर्शना खाली पोलीस पथकाने तब्बल सात सराईत आरोपींच्या मुसक्या आवळत चेन व मोबाईल स्नाचिंग सह घरफोडी,वाहन चोरीच्या सहा गुन्ह्याचा छडा लावीत ४ लाख ९२ हजार ६९१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती नारपोली पोलोसांनी दिली आहे.
नारपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील सहायक पोलीस उप निरीक्षक अनिल धिवार, पोहवा जयराम सातपुते, हरिष हाके, सुशिल इथापे, समीर ठाकरे, नंदकिशोर सोनगिरे, पोना संदीप जाधव, सागर म्हात्रे, राजेश पाटील, पोशि जनार्दन बंडगर, ताटे या पथकाने सिसिटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून आसिफ मलिक बागवान (वय २३, रा. नवीवस्ती), अकबर शौकत शेख (वय २४, रा. निजामपुरा) यांच्या ताब्यातून ७२ हजार रुपये किमतीचे सहा महागडे मोबाईल, बैजनाथ भगवती प्रसाद वर्मा (वय ४७, रा.अंजुरफाटा), गौरी शंकर पुजारी आरक (वय ३०, रा.अंजुरफाटा) यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून २९८ किलो वजनाच्या अल्युमिनियम प्लेट्स, कॉपरचे पॉलिकॅब रोल व गुन्ह्यात वापरलेली टेम्पो असा असा दोन गुन्ह्यातील २ लाख ५५ हजार ६१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुलजार हुसैन अफताउद्दीन खान (वय २२, रा. वडपे) याच्या ताब्यातून चोरीची ६० हजार रुपयांची रिक्षा ताब्यात घेण्यात आली.तर इरफान जहाँगिर शेख (वय १९, रा. रोशनबाग), आबीद अकम अंसारी (वय २४, रा. माधवनगर) यांना मोबाईल व चैन स्नाचिंगच्या दोन गुन्ह्यात ताब्यात घेत त्यांच्या जवळून १ लाख ५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नारपोली पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे सहा गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश मिळविले आहे.