ट्रक धडकला, डिझेल सांडले अन् पेटली ४० प्रवाशांची लक्झरी बस; १२ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 06:41 AM2022-10-09T06:41:23+5:302022-10-09T06:42:36+5:30
भरधाव ट्रकने जोरदार धडक देताच बस समोरील बाजूने पेटली. क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
अझहर शेख / संदीप झिरवाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : यवतमाळ येथून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता मुंबईला निघालेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या विनावातानुकूलित स्लीपर लक्झरी बसला नाशिक शहरातील तपोवनाजवळ शनिवारी पहाटे पाच वाजता भीषण अपघात झाला.
भरधाव ट्रकने जोरदार धडक देताच बस समोरील बाजूने पेटली. क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. साखरझोपेत असलेल्या ५० प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी धावपळ केली; परंतु बसमधील बारा प्रवाशांचा हाेरपळून दुर्दैवी अंत झाला, तर ४३ प्रवासी जखमी झाले. जखमींवर नाशिक शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह तीन खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
ही बस औरंगाबाद महामार्गावरून पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाशिकच्या तपोवनाजवळील जेजूरकरमळा चौफुलीवर पोहोचली. याच अपघाती ब्लॅक स्पॉटवर भरधाव जाणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. त्यात ट्रकच्या डिझेल टँक फुटला आणि त्यातील इंधन रस्त्यावर पडून त्याने पेट घेतला. त्यात बसही पेटली. बसला आग लागली असल्याचे कळताच जे जागे होते त्यांनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याची धडपड केली. अनेकांनी जीव धोक्यात घालून इतरांनाही वाचवले.
मृतांच्या नातेवाइकांना ७ लाख
मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये तर गंभीर जखमींना दाेन लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जखमींना भेट दिल्यानंतर केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमींना पूर्ण उपचार केले जातील, कोणतीही काळजी करू नका, असे सांगत दिलासा दिला. केंद्राकडूनही मृतांच्या कुटुंबीयांना दाेन लाख तर गंभीर जखमींना ५० हजारांची मदत दिली जाणार आहे.
बसची धडक बसल्यानंतर ट्रकचा डिझेल टँक फुटला. त्यानंतर भीषण आग लागली. घटनेची माहिती पोलीस, अग्निशमन दलाला तब्बल अर्ध्या तासाने मिळाली. शहराच्या अगदी जवळ झालेल्या या अपघातावेळी आपत्कालीन मदत उशिराने पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
का घडले हे अग्नितांडव... आरटीओचे काय म्हणणे?
nऔरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात लक्झरी बस व ट्रक या दोन्ही वाहनांत झालेला भीषण अपघात हा दोन्ही वाहनांचा भरधाव वेग व रस्त्याच्या परिस्थितीकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) काढला आहे.
nआरटीओचे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांच्यासह सात जणांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून दोन्ही वाहनचालकांच्या दुर्लक्षपणामुळे अपघात झाल्याचे म्हटले आहे.
nदोन्हीपैकी एका वाहनचालकाने जरी वेगाची मर्यादा तसेच चौफुलीची परिस्थिती पाहून वाहन थांबविले असते तर कदाचित अपघात घडला नसता, असा अहवाल तयार केला आहे.
nज्या ट्रकला बसने धडक दिली त्यात कोळसा भरलेला होता. त्यात क्षमतेपेक्षा जास्त माल नव्हता. हा ट्रक सुरतहून नाशिक बाजूने मनपा हद्दीतील टाकळी रस्त्याने पुढे होऊन नाशिक रोड मार्गे सिन्नर औद्योगिक वसाहतीत जात होता. बस नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गाने नाशिक बाजूकडे येत होती. बसमध्ये नेमके किती प्रवासी होते याची आकडेवारी अद्यापही आरटीओला स्पष्ट झालेली नाही.