जात पडताळणीचे नाशिकचे उपसंचालक, विधी अधिकाऱ्यांसह लाच घेताना चारजण जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 16:18 IST2019-09-05T15:54:12+5:302019-09-05T16:18:17+5:30
विशेष म्हणजे हे अधिकारी शिर्डीत एका ठराविक हॉटेलला वारंवार येत असत व तेथेच ते संबधितांना बोलावून कामाच्या बदल्यात लाच घेत असत आणखीही काही कागदपत्रे मिळाली

जात पडताळणीचे नाशिकचे उपसंचालक, विधी अधिकाऱ्यांसह लाच घेताना चारजण जेरबंद
शिर्डी - एस़टी़ प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी करणाऱ्या नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालक व विधी अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे हे अधिकारी शिर्डीत एका ठराविक हॉटेलला वारंवार येत असत व तेथेच ते संबधितांना बोलावून कामाच्या बदल्यात लाच घेत असत आणखीही काही कागदपत्रे मिळाली असून यातून अनेक प्रकार पुढे येण्याची शक्यता लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक (वर्ग १)रामचंद्र रतीलाल सोनकवडे, (वय-४०, रा. पकाल रोड, काटे गल्ली, द्वारका, नाशिक) व विधी अधिकारी शिवाप्रसाद मकूंदराव काकडे, (वय-४१, वसंत विहार, बडदेनगर, सिडको, नाशिक), विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन (वय-३३, खासगी चालक, वसंत विहार, बडदेनगर, सिडको, नाशिक), मच्छिंद्र मारूती गायकवाड, (वय-४८, लॅब बॉय, वर्ग-४, गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय, नगर -रा. शिवाजीनगर, नविन नागापूर, एमआयडीसी, अहमदनगर) अशी या आरोपींची नावे आहेत.
धनकवडी, पुणे येथील एका व्यक्तीला एस़टी़ प्रवर्गाचे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवुन देण्यासाठी सोनकवडे व काकडे या आरोपींनी काल पाच लाख रूपयांची लाच मागितली होती. आज रात्री एकच्या सुमारास शिर्डीतील हॉटेल साई आसरा येथील रूममध्ये दोन्ही आरोपींना भेटल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम हॉटेलबाहेर असलेल्या महाजन व गायकवाड यांच्याकडे देण्यास सांगितली. यानंतर तक्रारदार लाच देत असतानाच पोलीसांनी संबधितांना रंगेहाथ व पंचासमक्ष ताब्यात घेतल्याचे या विभागाकडुन सांगण्यात आले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागाचे नगरचे पोलीस उपाधिक्षक हरीष खेडकर व पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दीपक करांडे यांनी सापळा रचुन आरोपींना पंचासमक्ष लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस कर्मचारी तन्वीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, सतिष जोशी, चालक अशोक रक्ताटे, विजय गंगुल, खेमनर, रविंद्र निमसे आदींचा सहभाग होता़ अलीकडच्या काळातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे़.