'जैश ए मोहम्मद' संघटनेवर NIA ची नजर; देशात ८ राज्यासह महाराष्ट्रातही ३ ठिकाणांवर धाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 07:39 IST2024-12-13T07:36:58+5:302024-12-13T07:39:31+5:30
अमरावतीत धाड सुरू होती त्याचवेळी भिवंडीत NIA च्या दुसऱ्या पथकाने खादीपार परिसरातील कामरान अंसारी याच्या घरावर धाड टाकली

'जैश ए मोहम्मद' संघटनेवर NIA ची नजर; देशात ८ राज्यासह महाराष्ट्रातही ३ ठिकाणांवर धाड
मुंबई - नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA)च्या पथकानं जैश ए मोहम्मद दहशतवाद षडयंत्र प्रकरणी १२ डिसेंबरला देशातील ८ राज्यातील १९ ठिकाणांवर धाड टाकली. आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात याठिकाणी छापेमारी करण्यात आली. यावेळी अनेक संशयास्पद कागदपत्रे, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, सीडी, हार्ड डिस्कसह अन्य उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
जैश ए मोहम्मदचा संशयित दहशतवादी शेख सुल्तान सलाह उद्दीन उर्फ अयूबी याच्या निकटवर्तीयांवर ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. अयूबीला याआधीच अटक करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये जैश ए मोहम्मद संघटनेशी निगडित प्रचार आणि प्रसार करण्याचा आरोप आहे. युवकांना संघटित करून कट्टरपंथी बनवणे आणि दहशतवादी संघटनेत भरती करणे या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एका मौलवीचा सहभाग होता. त्याची चौकशी करण्यात आली आहे.
अमरावतीतील २६ वर्षीय युवकासोबत भिवंडीतही एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अमरावतीत मोहम्मद मुसीब शेखच्या घरावर NIA अधिकाऱ्यांनी सकाळी ३.३० च्या सुमारास छापा टाकला. एनआयए टीम घरी पोहचताच अर्धा तास घरचा दरवाजा उघडला नव्हता. त्यानंतर मोहम्मद मुसीबला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुसीबच्या घरी छापेमारी केल्यावर पुस्तके, डायऱ्या सापडल्या त्यात काही पाकिस्तानी नंबरही आढळले. ज्या डायरीत पाकिस्तानी नंबर आहेत ते नातेवाईकाचे आहेत असं घरच्यांनी दावा केला. मागील काही महिन्यापासून माझा मुलगा परफ्यूमचा व्यवसाय करतो, तर मुसीबचे वडील रिक्षा चालवतात असं त्याच्या आईने सांगितले.
#WATCH | National Investigation Agency (NIA) is conducting searches at 19 locations in J&K, Assam, Maharashtra, UP and Gujarat in a case linked to radicalization of individuals associated with Jaish-e-Mohammed, and the dissemination of terrorist propaganda.
— ANI (@ANI) December 12, 2024
(Visuals from Uttar… pic.twitter.com/L5xRQQdhGA
अमरावतीत धाड सुरू होती त्याचवेळी भिवंडीत NIA च्या दुसऱ्या पथकाने खादीपार परिसरातील कामरान अंसारी याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरचा शोध घेतला असता लॅपटॉप आणि काही कागदपत्रे जप्त केली. अंसारी मालेगावचा रहिवासी आहे. तो खूप धार्मिक आहे. व्यवसायाने तो इंजिनिअर आहे असं त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. अंसारीलाही एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आसामच्या गोलपारा, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अमरावती, उत्तर प्रदेशातील झांशी, बरेली, देवबंद, सहारनपूर, बिहारमधील सीतामढी, पश्चिम बंगालमधील हुगली, जम्मू काश्मीरमधील बारामूला, रियासी, बडगाम, अनंतनाग, राजस्थानमधील डुंगरपूर आणि गुजरातमधील मेहसाणा येथे NIA च्या पथकाने छापेमारी केली आहे.