सायबर फसवणूकप्रकरणी देशभर छापे, दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 05:21 AM2024-11-29T05:21:34+5:302024-11-29T05:22:44+5:30
दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट प्रमुख सूत्रधार! १५ हजार बँक खात्यांतून हजारो कोटी रुपयांची अफरातफर, दिल्लीत एका चार्टर्ड अकाउंटंटच्या फार्महाऊसवर धाड टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले असता अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.
मुंबई - सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारे हजारो कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणाची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या हाय-इंटेन्सिटी युनिटने गुरुवारी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली. दिल्लीत एका चार्टर्ड अकाऊंटंटच्या फार्महाऊसवरील छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.
या छाप्यांदरम्यान १५ हजार बँक खात्यांतून हजारो कोटी रुपयांची अफरातफर झाल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हजारो डेबिट कार्ड, मोबाईल फोन जप्त केले आहेत. गेल्या काही महिन्यांत देशाच्या विविध भागांत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर ठगांनी लाखो नागरिकांचे हजारो कोटी रुपये लांबविले. या सर्व माहितीची अधिकारी छाननी करीत होते.
दिल्लीतील चार्टर्ड अकाउंटंट प्रमुख सूत्रधार
गुन्हेगारीचे संपूर्ण नेटवर्क दिल्लीतील अशोक शर्मा हा चार्टर्ड अकाउंटंट आणि त्याचा भाऊ चालवीत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या दिल्लीतील फार्महाऊसवर छापेमारी केली. त्यावेळी शर्मा बंधूंसह अन्य तिघांनी ईडीचे अतिरिक्त संचालक सूरज यादव यांच्यासह ईडी पथकावर हल्ला केला. या प्रकरणी शर्माच्या एका नातेवाइकाला पोलिसांनी अटक केली आहे. उकळलेला पैसा युएईयेथील पायपल पेमेंट कंपनीकडे वळविण्यात आल्याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळाली. या कंपनीने हा पैसा मिळाल्यानंतर तो क्रिप्टो करन्सीत गुंतविल्याचे तपासात समोर आले आहे.