फोर्ट येथील ईडी कार्यालयाभोवती पोलीस छावणीचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:45 PM2019-08-21T21:45:35+5:302019-08-21T21:49:21+5:30
ईडीच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला शंभर मीटरपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे.
मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या अंमलबाजवणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी होणार असल्याने दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात जेथे ईडीचे कार्यालय आहे तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज परिसराची पाहणी करुन बंदोबस्ताची आखणी केली असून आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची होणाऱ्या चौकशीवेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहू नये, असे आवाहन राज यांनी केले असले तरी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यालयाच्या दोन्ही बाजूला शंभर मीटरपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला आहे. याठिकाणी असलेल्या विविध बॅँका, वित्तीय संस्था आणि अन्य कार्यालयात काम करणाऱ्यांनाच त्याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. पोलीस गणवेषासह साध्या वेशातही नेमण्यात आले आहेत.