नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:43 AM2024-07-03T06:43:51+5:302024-07-03T06:44:28+5:30

ही टोळी एकामागे पाच ते दहा लाख रुपये उकळत होती. ब्रह्म ज्योती याच्या टोळीने मुंबई आणि चेन्नई येथून आठजणांना टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला पाठविले.

Naval officers involved in human trafficking; Shocking information in the investigation of the crime branch | नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

मुंबई - ते दोघेही वर्गमित्र. शिक्षणामुळे नौदलात दाखल झाले. एक लेफ्टनंट, दुसरा सब लेफ्टनंट. पैशांच्या मोहाने मात्र त्यांनी मानवी तस्करीची वाट धरली, अशी धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे. या टोळीचे थेट पाकिस्तान कनेक्शनही समोर येत असल्याने गुन्हे शाखेने दोघांची चौकशी सुरू केली आहे.

गुन्हे शाखेने सब-लेफ्टनंट असलेला ब्रह्म ज्योती, त्याचा वर्गमित्र लेफ्टनंट विपीनकुमार डागर आणि सिमरन तेजी यांच्यासह रविकुमार आणि दीपक डोगरा यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही टोळी भारतातून नागरिकांना अवैधरित्या द. कोरियात पाठवत होती, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी व्हिसा घेऊन दक्षिण कोरियामध्ये जात आहेत. यातील बहुसंख्य हे दक्षिण कोरियातील सुंदरी भागात वास्तव्यास आहेत. येथे भारतातून गेलेल्यांची भेट पाकिस्तान आणि बांगलादेशमधून जाणाऱ्यांशी होत असल्याने या प्रकरणात दहशतवादाचे काही कनेक्शन आहे का, याचाही तपास करणार आहे.

ही टोळी एकामागे पाच ते दहा लाख रुपये उकळत होती. ब्रह्म ज्योती याच्या टोळीने मुंबई आणि चेन्नई येथून आठजणांना टुरिस्ट व्हिसावर दक्षिण कोरियाला पाठविले. मात्र, यातील दोघांना दक्षिण कोरियाने माघारी धाडले. ते जम्मू-काश्मीरचे रहिवासी असून, सीआययूचे पथक या दोघांचा जबाब नोंदविणार आहे, तर १२ जणांच्या कागदपत्रांचा संशय आल्याने कोरियन दूतावासाने त्यांना टुरिस्ट व्हिसा नाकारल्याचे तपासात समोर आले. सीआययूने डागरकडून १४ पासपोर्ट जप्त केले. त्याच्या बँक खात्यातून ४० लाखांहून अधिकची रक्कम व सिमरन तेजीच्या खात्यातही मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे.

दातांचा डॉक्टर अन् भांडाफोड
नववी पास असलेला रविकुमार हा कारपेंटर आहे. त्याला दातांचा डॉक्टर बनवून दक्षिण कोरियाला पाठविण्याचा प्रयत्न सुरू होता. तो मूळचा जम्मूचा असून, नाशिकमध्ये प्रॅक्टिस करत असल्याचे दाखवले होते. रविकुमारला दूतावासाकडून परवानगी नाकारली होती. मात्र, तो आपला भाऊ असल्याचे सांगून डागरने दूतावासातील अधिकाऱ्यांशी वाद घातला. यातूनच या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याचे समजते.

Web Title: Naval officers involved in human trafficking; Shocking information in the investigation of the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.