नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनी बुडणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 07:22 PM2018-09-11T19:22:03+5:302018-09-11T19:22:56+5:30
मुंबई - मरीन ड्राईव्ह येथील समुद्रात बुडणाऱ्या तरुणाला नौदलाच्या जवानांनी मोठ्या शर्तीने त्याचे प्राण वाचवल्याची घटना रविवारी रात्री घडली. बुडणाऱ्या तरुणाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. हा तरुण अद्याप बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबईच्या मरीन ड्राईव्हचा किनारा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी येत असतात. या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस आणि नौदलाचे अधिकारी कायम त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात. दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी रात्री नौदलाचे अधिकारी आकाश, धनंजय आणि विश्वकर्मा हे नेहमीप्रमाणे गस्तीसाठी मरीन ड्राईव्हच्या समुद्रात गस्तीसाठी आले होते. त्यावेळी समुद्र किनाऱ्यापासून १५० मीटर आत समुद्रात कुणीतरी बुडत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती त्यांनी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला देत मदत मागवली. नौदलाच्या बोटीने त्या बुडत्या तरुणाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, खवळलेल्या समुद्रात बोट तग धरत नव्हती. त्यावेळी धनंजय या अधिकाऱ्याने समुद्रात उडी टाकत, बुडत असलेल्या तरुणाच्या दिशेने पोहत गेले. धनंजय आणि त्याच्यासोबत असलेल्या आकाश आणि विश्वकर्मा या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शर्तीने त्या तरुणाला बाहेर काढले. तोपर्यंत मरीन ड्राईव्ह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. बुडणाऱ्या तरुणाला वैद्यकिय उपचारांची मदत हवी असल्याचे लक्षात येताच त्याला पोलिसांच्या मदतीने शासकिय रुग्णालयात उपचापासाठी नेले. बुडणारा तरुण अद्याप बेशुद्ध असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या तरुणांची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नौदलाचे अधिकाऱी आणि पोलिसांनी केलेल्या या विशेष कामगिरीचे उपस्थित असलेल्या नागरिकांकडून कौतुक केले.