नवी मुंबई: तुर्भे येथून प्रतिबंधित गुटखा जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 14, 2022 06:23 PM2022-09-14T18:23:14+5:302022-09-14T18:24:10+5:30
२५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गुन्हे शाखा पोलिसांनी तुर्भे येथून २५ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. टपरीवर गुटखा विकला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी टपरी चालकावर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्भे सेक्टर २० येथे सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी असलेल्या मनोज पान शॉप या टपरीवर गुटखा विकला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी टपरीमध्ये गोणीत ठेवलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. सुमारे २५ हजार रुपये किमतीचा हा गुटखा टपरी चालकाने विक्रीसाठी साठवला होता. मात्र त्याला गुटखा पुरवणाऱ्याचे नाव अद्याप पोलिसांसमोर आलेले नाही. या प्रकरणी टपरी चालक मनोज चौहान विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याच्याकडून आढळलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.