प्रोजेक्ट मॅनेजरच्या नोकरीस भूलला अन् सात लाख गमावून बसला...
By नारायण जाधव | Published: July 29, 2023 09:04 PM2023-07-29T21:04:48+5:302023-07-29T21:05:03+5:30
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशुतोष यांची सानपाडा पोलिसांत तक्रार
नवी मुंबई : चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने सानपाड्यामध्ये राहणाऱ्या ४९ वर्षीय आशुतोष बिष्ट यांची ७ लाख रुपये उकळून त्याची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी सायबर गुन्हेगाराच्या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
आशुतोष हे नाेकरीच्या शोधात होते. याचाच गैरफायदा उचलून त्यांना तुमची नोकरीसाठी निवड झाल्याचा ई-मेल पाठवून तुम्हाला पीएमपी नावाचा कोर्स करावा लागेल, असे सांगितले. त्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजरची नोकरी व एक लाख ६० हजार ऑस्ट्रेलियन डॉलर पगार मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर कोर्ससाठी लागणारी ४८,६४० रुपये व नोकरीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे त्याच्याकडून मागून घेतली. याशिवाय डिपॉझिट आणि अन्य कारणे दाखवून त्यांच्याकडून तब्बल सात लाख रुपये उकळून संपर्क साधणे बंद केले. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आशुतोष यांनी सानपाडा पोलिसांत तक्रार केली.