मी आत्महत्या करतेय! मुलीनं आईच्या फोनवरून मेसेज केला; तपासात धक्कादायक प्रकार समोर आला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 09:14 AM2021-08-10T09:14:26+5:302021-08-10T09:14:53+5:30
अभ्यासाचा तगादा लावल्याने आईची हत्या; मुलीने रचला आईच्या आत्महत्येचा बनाव
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : अभ्यासाचा तगादा लावण्यावरून झालेल्या भांडणात पंधरा वर्षीय मुलीने आईचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या मुलीने आईच्या हत्येनंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचून कुटुंब व पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घटनास्थळावरील परिस्थिती व पोलिसांच्या संशयापुढे तिचा बनाव टिकला नाही.
ऐरोली सेक्टर ७ येथे राहणाऱ्या शिल्पा जाधव या महिलेचा ३० जुलैला घरात मृतदेह आढळला होता. घटनेच्या काही वेळ अगोदर त्यांच्या मोबाइलवरून पती, भाऊ व इतर नातेवाइकांना आत्महत्या करत असल्याचे मेसेज
पाठवले गेले होते. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली होती. पण, घटनास्थळावरील परिस्थितीवरून पोलिसांना हत्येचा संशय होता. त्यात शवविच्छेदन अहवालात त्याची पुष्टी झाल्याने पोलिसांचा कुटुंबातील सदस्यांवरच संशय बळावला होता. यामुळे पोलिसांनी घटनेवेळी घरात उपस्थित मुलीकडे चौकशी केली असता, तिनेच आईची हत्या केल्याची बाब उघडकीस आली.
असा केला आत्महत्येचा बनाव
आईने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी तिने आईच्या मोबाइलवरून वडील, मामा व मावशी यांना “मी कंटाळून आत्महत्या करत आहे”, असा मेसेज पाठवला होता. शिवाय, बेडरूमचा दरवाजा बंद करून चावी काढून घेतली होती. काही वेळातच मामा, वडील घरी आले असता त्यांनी बेडरूमचा दरवाजा तोडला असता आतमध्ये शिल्पा यांचा मृतदेह आढळला. या प्रकरणी अधिक चौकशीत सहायक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.
घटनास्थळी शिल्पा यांचा मृतदेह पडलेला असताना त्यांच्या गळ्याला कापडी पट्टा होता. परंतु छताचा पंखा चालू स्थितीत होता. यामुळे आत्महत्या नसून त्यांचा गळा आवळला असावा, असा पोलिसांना संशय होता. तसेच घटनेच्या तीन दिवस अगोदर मुलीच्या शिक्षणावरूनच या कुटुंबाचा वाद पोलिसांनी मिटवला होता. त्यामुळे मुलीवर संशय असल्याने पोलिसांनी तिच्याकडे चौकशी सुरू ठेवली असता तिने रविवारी हत्येची कबुली दिली.
गळा आवळण्यास कराटेच्या पट्ट्याचा वापर
मुलीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, असे या माता-पित्यांना वाटत होते. यासाठी त्यांनी एनईईटीच्या परीक्षेचा क्लासदेखील तिला लावला होता. त्यामुळे पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी तिने अधिकाधिक वेळ अभ्यास करावा, याचा तगादा पालकांकडून लावला जात होता. त्यावरूनच ३० जुलैला अभ्यासावरून आई व मुलीत भांडण होऊन झटापट झाली. त्यामध्ये मुलीच्या धक्क्याने शिल्पा खाली पडल्या. त्या पुन्हा उठण्याच्या तयारीत असतानाच मुलीने आईचा गळा आवळून हत्या केली. यासाठी तिने तिच्या कराटे क्लासचा कापडी पट्टा वापरला होता.