नवी मुंबईत सर्वाधिक गांजाचा धूर, तरुणाई अमली पदार्थांच्या गर्तेत 

By सूर्यकांत वाघमारे | Published: February 14, 2023 04:29 PM2023-02-14T16:29:40+5:302023-02-14T16:31:48+5:30

अमली पदार्थ विक्रीमुळे नवी मुंबईला गुन्हेगारी स्वरूप प्राप्त होत चालले आहे. तरुणांना नशेची लत लावून गैर मार्गाला लावले जात आहे.

Navi Mumbai has the most ganja smoke, youth in drug addiction | नवी मुंबईत सर्वाधिक गांजाचा धूर, तरुणाई अमली पदार्थांच्या गर्तेत 

नवी मुंबईत सर्वाधिक गांजाचा धूर, तरुणाई अमली पदार्थांच्या गर्तेत 

googlenewsNext

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात विविध प्रकारच्या अमली पदार्थांची विक्री होत आहे. त्यामध्ये गांजाची सर्वाधिक विक्री व पुरवठा होत असल्याचे पोलिसांच्या कारवायांमधून समोर येत आहे. मागील दोन वर्षात तब्बल १२६ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तर गतवर्षी एकाच कारवाईत ३६२ कोटीचे ७२ किलो हेरॉईन जप्त केले असून ते पंजाबला नेले जाणार होते. 

अमली पदार्थ विक्रीमुळे नवी मुंबईला गुन्हेगारी स्वरूप प्राप्त होत चालले आहे. तरुणांना नशेची लत लावून गैर मार्गाला लावले जात आहे. त्यात काही मुली देखील नशेच्या आहारी गेल्या असून त्यात महाविद्यालयीन तरुणी सर्वाधिक आहेत. कल्चरच्या नावाखाली हुक्का पार्लरमध्ये पाऊल ठेवणाऱ्या या तरुणी हळू हळू वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या आहारी जात आहेत. तर तरुणांमध्ये गांजासह चरस व मेथॅक्यूलॉन ड्रग्सची अधिक मागणी आहे. त्यापैकी गांजा हा सहज उपलब्ध होत असल्याने त्याचे सेवन करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कामगार वर्गासह रिक्षाचालक, बेरोजगार तरुण तर काही प्रौढ व्यक्ती देखील गांजाची नशा करत आहेत. त्यांना राहत्या परिसरात हा गांजा उपलब्ध करून देणारे जाळे संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात सक्रिय आहे. तर टपरी ह्या गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र ठरत आहेत. 

शहरात आणले जाणारे अमली पदार्थ देशाबाहेरून अथवा गुजरात व इतर राज्यातून महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यासाठी ट्रॅव्हल्स सोबतच खासगी वाहनांचा वापर होताना दिसत आहे. यापूर्वी काही ट्रॅव्हल्सच्या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती शेकडो किलोचा गांजा लागलेला आहे. मात्र छोटे विक्रेते व्यतिरिक्त मोठे पुरवठादार पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे शहरातील अमली पदार्थ विक्री व पुरवठ्याचे रॅकेट पूर्णपणे मोडीत निघू शकलेले नाही. परिणामी वेळोवेळी पोलिसांना कारवाई करून अमली पदार्थ जप्त करावे लागत आहेत. 

नशेत वाढती गुन्हेगारी 
अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्यांकडून नशेत गुन्हेगारी पाऊल उचलले जात आहे. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. गुन्हेगार नशा करून गुन्हे करत असल्याने त्यादरम्यान त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर जीवघेणा हल्ला देखील केला जातो. अशाच प्रकारातून टॅक्सी चालकाच्या हत्येची देखील घटना घडलेली आहे. तर आपसातील वर्चस्व निर्मितीच्या प्रयत्नातून टोळीयुद्ध देखील भडकत आहेत. 

झोपड्यांमध्ये उघडपणे विक्री
गांजाची विक्री होणाऱ्या अड्ड्यांमध्ये बहुतांश झोपडपट्टी भागांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी अशा अनेक झोपडपट्टी भागांची माहिती महापालिकेला देखील दिलेली आहे. त्यानंतर देखील या झोपड्या हटत नसल्याने गुन्हेगारांना आश्रय मिळत आहे. 

विदेशी नागरिकांचाही सहभाग 
अमली पदार्थ विक्रीत विदेशी नागरिकांचा देखील सहभाग दिसून येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खारघरमध्ये कारवाई करून नायझेरियन व्यक्तीचे मोठे रॅकेट उघड केले होते. त्याठिकाणावरून १ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. तर यापूर्वी देखील अनेक विदेशी नागरिकांकडून लाखो रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.  

मागील दोन वर्षात जप्त केलेले अमली पदार्थ 
अमली पदार्थ  - २०२१        -    २०२२
हेरॉईन      - १०३ ग्रॅम       -   ७३ किलो ४०८ ग्रॅम 
चरस       - १ किलो ५१२ ग्रॅम -  ०४ किलो ६२७ ग्रॅम 
गांजा       - ९३ किलो ५२९ ग्रॅम - २८ किलो ९७१ ग्रॅम  
मेथॅक्यूलॉन   - २ किलो ८५० ग्रॅम -  ०४ किलो २२९ ग्रॅम


२०२१ मध्ये ३ कोटी ८९ लाखाचे अमली पदार्थ जप्त.
२०२२ मध्ये ३६८ कोटी ३७ लाखाचे अमली पदार्थ जप्त.

नशा करणाऱ्यांवर कारवाई.
२०२१ मध्ये ३१ जणांवर 
तर २०२२ मध्ये ११८ जणांवर कारवाई केली आहे. 
 

Web Title: Navi Mumbai has the most ganja smoke, youth in drug addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.