नवी मुंबई महापालिकेची वेबसाईट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 09:52 PM2021-01-27T21:52:46+5:302021-01-27T21:53:38+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची घटना बुधवारी घडली. संध्याकाळच्या सुमारास काहींना वेबसाईट वर "सोनिक" चे संदेश दिसू लागले.
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची घटना बुधवारी घडली. संध्याकाळच्या सुमारास काहींना वेबसाईट वर "सोनिक" चे संदेश दिसू लागले. हि बाब निदर्शनास येताच वेबसाईट वरील संदेश हटवून वेबसाईट पुन्हा पूर्ववत करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली.
बुधवारी देशभरातील काही शासकीय वेबसाईटवर हल्ला होणार असल्याचे केंद्राकडून सायबर पोलिसांना मिळाले होते. त्यानुसार नवी मुंबई सायबर सेलकडून दोन्ही परिमंडळ उपायुक्तांना याची कल्पना देऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांना कळवण्याचे सांगण्यात आले होते.
बुधवारी संध्याकाळच्या सुमारास नवी मुंबई महानगर पालिकेची वेबसाईट हॅक झाल्याची बाब उघडकीस आली. वेबसाईट उघडताच त्यावर "सोनिक" असा संदेश दिसत होता. त्यावरून वेबसाईटवर सायबर हल्ला झाल्याचे दिसून आले. महापालिकेकडून सध्या कर भरणा तसेच इतर विविध सुविधा ऑनलाईन पुरवल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेच्या वेबसाईटवर करदात्यांचा डेटा आहे. हॅकर ने हा डेटा चोरला असल्याची अथवा वेबसाइटवरून उडवला असल्याची शक्यता आहे. दरम्यान वेबसाईट हॅक झाल्याचे निदर्शनास येताच पालिका अधिकाऱ्यांनी वेबसाईट पूर्ववत करण्याच्या कामाला सुरवात केली. मात्र वेबसाईट हॅक झालेली नसून फक्त क्रॅक झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वेबसाईटवरील इतर लिंक व ऍप्लिकेशन सुरक्षित असल्याचीही खात्री पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.