गोव्यात नवी मुंबई पोलिसांचाच ‘गेम’; सापळा तिघांवर, पणजी पोलिसांमुळे एकच लागला हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 08:55 AM2022-08-06T08:55:33+5:302022-08-06T08:55:55+5:30
विकी देशमुख प्रकरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३३ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोक्कामधील गुन्हेगार विकी देशमुख याला ३० जुलैला पणजीमधून अटक केली आहे.
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सराईत गुन्हेगार विकी देशमुख याच्यावर पणजी येथे लावलेल्या सापळ्यात मोक्कामधीलच इतर दोन गुन्हेगार निसटल्याची बाब समोर आली आहे. पणजी पोलिसांच्या मदतीने एका कॅसिनोबाहेर सापळा रचलेला असताना, नवी मुंबई पोलीस तिघे गुन्हेगार एकत्र येण्याची वाट बघत होते. त्यावेळीच पणजी पोलिसांनी विकीवर झडप टाकली. त्यामुळे इतर दोघांनी पोबारा केल्याने नवी मुंबई पोलिसांचा नियोजनबद्ध गेम फसला.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३३ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या मोक्कामधील गुन्हेगार विकी देशमुख याला ३० जुलैला पणजीमधून अटक केली आहे. गुन्हे शाखा पोलीस गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या शोधात होते. अखेर तो इतर काही साथीदारांसह गोव्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे देशमुख याच्यासह जितेंद्र देशमुख ऊर्फ बाळा व परशुराम मोकल यांना शिताफीने पकडण्याचा बेत नवी मुंबई पोलिसांनी आखला होता. यासाठी गुन्हे शाखा उपायुक्तांसह पथक पणजीला दाखल झाले होते. त्याद्वारे सापळा रचून ताब्यात घेतले.
कारवाईवेळी त्याच्याकडे एक पिस्तूल मिळून आल्याने पणजीमध्ये गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात त्याचा ताबा पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे या गुन्ह्यात सुटल्यानंतर तो परत हातून निसटू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने गोव्यातील मुक्काम वाढवला होता. अखेर गुरुवारी नवी मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून शुक्रवारी रात्री त्याला नवी मुंबईत आणले.
स्थानिक पोलिसांसोबत वाद?
कारवाईसाठी स्थानिक पोलिसांची मदत हवी असल्याने पणजी पोलिसांना कळवण्यात आले होते. परंतु, एका अधिकाऱ्याकडून देशमुखबद्दलची गुप्तता राखण्याऐवजी त्याच्या गुन्हेगारीचा पाढा वाचण्यात आला.
त्यामुळे गोवा पोलिसांनी बाजी पलटवून विकी देशमुख दिसताच त्याच्यावर झडप टाकली. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांना हवे असलेले इतर दोघे सावध झाल्याने ते हाती लागलेच नाहीत. यावरून नवी मुंबई पोलीस व गोवा पोलीस यांच्यात वाददेखील झाल्याचे सूत्रांकडून समजते.