जेलमधून रजेवर आला होता प्रियकर; विवाहित प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 13:57 IST2025-04-01T13:56:35+5:302025-04-01T13:57:14+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केल्याच्या प्रकरणात त्याला २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती

जेलमधून रजेवर आला होता प्रियकर; विवाहित प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, कारण अस्पष्ट
जायकवाडी - एका खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर बाहेर आलेल्या ३० वर्षीय युवकाने त्याच्या २८ वर्षीय विवाहित प्रेयसीसह विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पैठण तालुक्यातील कातपूर शिवारात ही घटना उघडकीस आली. नवनाथ जगधने आणि शीतल दोडवे उघडे अशी मयतांची नावे आहेत.
कातपूर येथील नवनाथ जगधने आणि पतीपासून विभक्त राहणारी शीतल दोडवे हे प्रमीयुगुल २०२० पासून एकत्र राहत होते. नवनाथ जगधने याने शीतलच्या मुलाचा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केल्याच्या प्रकरणात त्याला २०२३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यामुळे तो २०२३ पासून छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात शिक्षा भोगत होता. ६ मार्च रोजी तो संचित रजेवर बाहेर आला होता. २८ मार्चला नवनाथला परत कारागृहात जायचे होते. तत्पूर्वी नवनाथ जगधने आणि शीतल दोडवे यांनी कातपूर शिवारात एका विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
ही माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेत दोघांची समजूत काढली त्यानंतर त्यांना घरी आणले. परंतु शनिवारी हे दोघेही पुन्हा घरातून निघून गेले. सोमवारी संध्याकाळी ५ वाजता कातपूर शिवारातील एका शेतात या प्रेमीयुगुलाने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह पैठण येथील शासकीय रूग्णालयात पाठवले.
दरम्यान, या प्रेमी युगुलाने आत्महत्या का केली हे समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.