माजी नगरसेवकांवर गोळीबार करून पसार झालेल्या नव्वा व सचिनला पुण्यातून उचलले
By विजय.सैतवाल | Published: February 13, 2024 04:38 PM2024-02-13T16:38:25+5:302024-02-13T16:38:31+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : चाळीसगाव पोलिसांच्या दिले ताब्यात
जळगाव : चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करुन पसार झालेल्या सचिन सोमनाथ गायकवाड (२३, रा. घाटरोड, चाळीसगाव) व अनिस उर्फ नव्वा शेख शरीफ शेख (२३, रा. हुडको, चाळीसगाव) या दोघांच्या पुणे येथील लोणीकंद परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
चाळीसगाव येथील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर ७ फेब्रुवारी रोजी कारमधून आलेल्या पाच जणांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात ठाण्यात दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले होते.
हल्लेखोरांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरु असताना ते पुणे व अहमदनगर जिल्ह्यात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार या पथकाने पुणे येथील लोणीकंद परिसरातून सचिन गायकवाड व अनिस उर्फ नव्वा शेख शरिफ शेख याच्या मुसक्या आवळल्या. त्यांना चाळीसगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक राहुल पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, शिवदास नाईक, हेमंत पाटील, किशोर मोरे, ईश्वर पाटील यांच्या पथकाने केली.