नौदल, नारकोटिक्स हादरले! एलन मस्कच्या स्टारलिंकच्या मदतीने भारतात ड्रग तस्करी, चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 08:32 AM2024-12-04T08:32:01+5:302024-12-04T08:32:35+5:30
भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे.
एलन मस्क आणि नियमांची पायमल्ली हे समीकरण काही नवीन नाही. मस्क भारताच्या नियमांत सूट मिळवून त्यांच्या दोन कंपन्या टेस्ला आणि स्टारलिंक लाँच करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू काही केल्या भारत नियमांत सूट देण्यास तयार नाहीय. मस्क यांच्या कंपन्यांना सूट का दिली जात नाहीय याचे जिवंत उदाहरण समोर आले आहे.
भारताच्या जलक्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग साठा जप्त करण्यात आला आहे. अंदमानच्या पोलिसांनी या ड्रग्जच्या वाहतुकीचा तपास केला असता त्यामागे स्टारलिंकचा मोठा हात असल्याचे समोर आले आहे. मस्क यांची कंपनी स्टारलिंकच्या उपकरणाच्या मदतीने तस्करांवी भारतीय जलक्षेत्रात प्रवेश केला होता. जिथे कशाचीच रेंज येत नाही तिथे स्टारलिंकने रेंज देत इंटरनेट उपलब्ध करून दिले होते. यामुळे त्या जहाजावर वायफाय क्षेत्र तयार झाले व तस्करांचे मोबाईल जगाशी जोडले गेल्याचे समोर आले आहे.
गेल्या आठवड्यात अंदमान निकोबार पोलिसांनी ३६० अब्ज रुपयांचे ड्रग पकडले होते. हे ड्रग घेऊन सहा म्यानमारचे तस्कर भारतात येत होते. आता या ड्रग तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलीस स्टारलिंककडे हे उपकरण कोणी विकत घेतले, कुठे घेतले, कोणी कोणी वापरले याची माहिती मागणार आहे.
स्टारलिंक ही कंपनी त्यांचे इंटरनेट हजारो सॅटेलाईटद्वारे पुरविते. ही कंपनी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात देखील इंटरनेट पुरवित असल्याचा दावा करते. परंतू, देशांच्या जलक्षेत्रात कव्हरेज देण्यासाठी त्या देशांची परवानगी हवी असल्याचे सांगते. तस्करांनी स्टारलिंकचा वापर करून भारतात घुसण्याचा प्रयत्न केल्याचे, वरिष्ठ पोलीस अधिकारी हरगोबिंदर एस. धालीवाल यांनी म्हटले आहे.
यावेळी सर्व कायदे धाब्यावर बसविण्यात आले. थेट सॅटेलाईटला जोडून फोन वापरण्यात आले. यामुळे वायफाय हॉटस्पॉट तयार झाला आणि त्याचा वापर भारतीय हद्दीत घुसण्यासाठी करण्यात आला. कंपनीच्या वेबसाईटनुसार हे एक कॉम्पॅक्ट, पोर्टेबल किट आहे जे एका छोट्या बॅगेत आरामात बसू शकते, असे धालीवाल म्हणाले.