नेव्ही कर्मचाऱ्याचा मोबाईल चोरून पसार झालेली दुकली गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 07:10 PM2022-02-08T19:10:18+5:302022-02-08T19:12:25+5:30
Robbery Case :दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
डोंबिवली: नेव्ही कर्मचा-याला मारहाण करीत त्याच्याजवळील मोबाईल चोरून पसार झालेल्या दोघांना चार तासातच अटक करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. हा चोरीचा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. सुदर्शन पटेल आणि अमित वागरे (दोघांचे वय 18) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघे अनुक्रमे मास्क विक्री आणि दूध विक्री करायचे. दोघांना मंगळवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नेव्हीत कर्मचारी असलेले सुदेश आमकर हे डोंबिवली पुर्वेकडील मढवी शाळेजवळील साईसदन इमारतीत राहतात. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता ते राजाजी पथ, स्वामी नारायण मंदिर समोरील रस्त्यावरून घरी परतत होते. साडेअकरा ते पावणोबाराच्या दरम्यान पाठीमागून आलेल्या दोघांनी आमकर यांची वाट अडवली आणि धककाबुककी करीत शिवीगाळ केली. दोघांपैकी एकाने आमकर यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशात असलेला मोबाईल जबरदस्तीने काढून साथीदारासह पोबारा केला. दरम्यान हा सर्व प्रकार तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला होता. आमकर यांनी लुटमार प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप शिंगटे यांच्या पथकाने सीसीटिव्हीच्या मदतीने अवघ्या चार तासात चोरटयांना बेडया ठोकल्या. आमकर यांच्या चोरण्यात आलेला मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
सहा महिन्यांपासून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी