‘त्या’ नौसैनिकाने भावी वधूच्या घरून घेतले नऊ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:35 AM2021-02-08T01:35:35+5:302021-02-08T01:38:06+5:30
सुरजकुमार याचा खून हा शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
- हितेन नाईक
पालघर : तलासरीतील वेवजी गावाच्या जंगलात सूरजकुमार दुबे या २७ वर्षीय नौदल सैनिकाचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात पुन्हा खळबळ माजली आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील साधू हत्याकांडानंतर अतिशय निर्घृणपणे नौसैनिकाचेही हत्याकांड झाल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कामगिरीविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. दरम्यान, सुरजकुमार याने आपल्या वागदत्त वधूच्या घरूनही ९ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले आहे.
सुरजकुमार याचा खून हा शेअर बाजारात गुंतविण्यात आलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीतून झाल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी याप्रकरणी १०० पोलिसांची १० पथके बनविण्यात आल्याची माहिती दिली असून या प्रकरणाचा कसून शोध घेण्यात येत आहे.
१ फेब्रुवारी रोजी सुरजकुमार याने आपल्या एटीएमचा वापर केला असून आपल्या होणाऱ्या वागदत्त वधूच्या घरून ९ लाखांची रक्कमही घेतल्याची बाब समोर आली आहे. लग्नाआधीच ९ लाख रुपये कशासाठी घेतले, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, मित्रांकडून अथवा एखाद्या खाजगी व्यक्तीकडून कर्जाऊ रूपाने घेतलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गडचिंचले येथील सामूहिक हत्याकांडाचे प्रकरण पोलिसांवर चांगलेच शेकले होते. आता या प्रकरणावरूनही गदारोळ माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघर पोलिसांवर पुन्हा प्रश्नचिन्ह
तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र अशा चार राज्यांच्या सीमा ओलांडून त्याला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आणून जाळण्यात आले. ही बाब गंभीर असून भाजप आ. राम कदम यांनी साधूंच्या हत्याकांडानंतर आता एका नौदल तरुणाचा जाळून खून केल्याने पालघर पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.