नवाब मलिकांना कोर्टाचा दणका, आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 09:02 PM2022-02-23T21:02:52+5:302022-02-23T21:14:22+5:30
ED Custody to Nawab Malik : न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.
मुंबई - राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे. सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात नवाब मलिक यांना हजर केले. ईडीने १४ दिवसांची नवाबांची कोठडी पाहिजे म्हणून युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने नवाब मालिकांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. आता नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहावे लागणार आहे.
नवाब मलिकांना १४ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीने कोर्टाकडे केली होती. तसेच नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी कोर्टात सांगितले की, मला समन्स न देता बोलावले आहे आणि ईडीने मलाच घरी ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी एनआयएने दाऊदविरोधात गुन्हा दाखल केला असे ईडीने ऍडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी सांगितले. मनी लाँडरिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुह्यांत दाऊदचा सहभाग असून दाऊद इब्राहिम हा जैश ए मोहम्मदसोबत काम कारतो. दाऊदची बहीण हसिना पारकर हिचे निधन झाले आहे, ती या सर्व कामांवर नियंत्रण ठेवत असे. अनेक मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांनी निधी उभारला आहे. कुर्ल्यातील गोवाले कंपाऊंडमधील मालमत्ताही हसीनाने जप्त केली आहे. मुनिरा आणि मरियम या दोघी या मालमत्तेच्या खऱ्या मालक आहेत. ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती, ती दोघांच्या मालकीची होती, त्यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. गोवा कंपाऊंड ही तीच जमीन आहे, ज्यावर नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला होता.
Mumbai | Special PMLA court sends Maharashtra minister and NCP leader Nawab Malik to Enforcement Directorate custody till 3rd March, in connection with Dawood Ibrahim money laundering case pic.twitter.com/jsKwV5ErdI
— ANI (@ANI) February 23, 2022
नवाब मलिक काही डी-गँगचे सदस्य नाहीत, वकिलांचा कोर्टात दावा
२०२२ मध्ये पिडीतेने जवाब देणे आणि त्यात मला २० वर्षे पूर्वी काय घडले माहित नाही असे सांगणे सोयीचे आहे. १५ वर्षे तुम्हाला भाडे मिळाले नाही, पण पिडीताने त्या बाबतीत काहीही केल्याचे दिसत नाही. तसेच मलिक यांच्या विरोधात कारवाई का? ते काय डी गँगचे सदस्य नाहीत, असा युक्तीवाद मलिकांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.
मलिकांचा संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही, वकिलांचा दावा
मुनिराला सलीम पटेल विरुद्ध तक्रार असेल तर या सगळ्यात मालिकांचा संबंध काय आहे? कारण मलिक स्वतःच याप्रकरणात बळी ठरले आहेत. कारण ज्या व्यक्तीकडे मालमत्तेचे अधिकार नव्हते त्यांनी मालिक यांना मालमत्ता विकली, असं मलिक यांचे वकील देसाई यांनी कोर्टात दावा केला आहे.