छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्याचे एन्काऊंटर, तीन पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त
By संजय तिपाले | Published: April 1, 2023 02:12 PM2023-04-01T14:12:40+5:302023-04-01T14:12:55+5:30
पोलिस-नक्षल्यांत धूमश्चक्री: गडचिरोली पोलिसांच्या सी -६० जवानांची कारवाई
संजय तिपाले/
गडचिरोली: महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील मुसपरसी (नारायणपूर) जंगल परिसरात १ एप्रिल रोजी सकाळी गडचिरोली पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात पोलिसांनी एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. घटनास्थळावरुन तीन पिस्तूलसह मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. गडचिरोली पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाने ही कारवाई केली.
महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील दंडकारण्यात (अबुझमाड) भामरागड तालुक्यातील मुसपरसी (नारायणपूर) जंगल परिसरात १ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता गडचिरोली पोलिस दलाच्या सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. घनदाट झाडींनी वेढलेल्या या जंगलात अचानक नक्षल्यांनी पोलिसांवर हल्ला केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला.
पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी पथकाने केलेल्या गोळीबारात एक नक्षलवादी ठार झाला. यावेळी घटनास्थळावरुन तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय नक्षलवाद्यांची शस्त्रसामुग्रीही हाती लागली. दरम्यान, सी ६० पथकातील जवान सुरक्षित असून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला. सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
.....