दोन आदिवासी युवकांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:13 IST2022-04-14T19:12:20+5:302022-04-14T19:13:00+5:30
Kidnap And Killed :एटापल्ली तालुक्यातून मध्यरात्री केले अपहरण

दोन आदिवासी युवकांचे अपहरण करून नक्षलवाद्यांनी केली हत्या
एटापल्ली (गडचिरोली): तालुक्यातील गट्टा (जांबिया) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या गावांतील रहिवासी असलेल्या आदिवासी युवकांची पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी निर्घृण केली. मध्यरात्री त्यांचे गावातून अपहरण केल्यानंतर गुरुवारी (दि.१४) त्यांचे मृतदेह आढळले. मंगेश मासा हिचामी (२७ वर्षे) रा. झारेवाडा आणि नवीन पेका नरोटे (२५ वर्षे) रा. गोरगुट्टा अशी मृत युवकांची नावे आहेत. यापैकी मंगेश हा आत्मसमर्पित नक्षली होता. त्याने तीन वर्षांपूर्वी नक्षल चळवळ सोडली होती. मंगेशला दि.१३ च्या रात्री १० वाजता त्याच्या घरातून, तर नवीन याला रात्री १ वाजताच्या सुमारास बळजबरीने त्याच्या घरातून नेले होते. जंगलात नेल्यानंतर त्यांची हत्या करून मृतदेह झारेवाडा ते गट्टा मार्गावर आणून ठेवले. सकाळी त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले.
एटापल्ली तालुक्यातील सूरजागड पहाडावर बुधवारी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना नियुक्तीसह इतर प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम झाला. या प्रकल्पाला नक्षलींचा विरोध असल्याने तो दर्शविण्यासाठी सदर हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.