ड्रग्ज प्रकरणात NCBची कारवाई, डी कंपनीच्या जवळ साथीदार राजिक चिकनाला धाडले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 08:50 PM2021-04-12T20:50:43+5:302021-04-12T20:51:22+5:30
NCB action in drug case : राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीचा जवळचा साथीदार राजिक चिकना याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातूनअटक करण्यात आली होती. दानिश मुंबईत दाऊदच्या ड्रग्सचा कारखाना चालवत होता.
दानिश चिकनाला राजस्थानमध्येअटक करण्यात आली
दाऊद इब्राहिमचा साथीदार दानिश याला एप्रिलच्या सुरुवातीला राजस्थानातून अटक करण्यात आली होती. दानिशसह मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले गेले. दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात दानिशच्या ड्रग्स फॅक्टरीवर छापे टाकल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. छापे टाकण्यापूर्वी दानिश ताबडतोब पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर एनसीबी दानिश चिकना शोधात होतं. अखेर राजस्थान पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून मुंबईला आणण्यात आले.
एनसीबीच्या दोन गुन्ह्यात फरार होता
दानिश त्याच्यावरील अनेक प्रकरणांमध्ये फरार होता. त्यावर कारवाई करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यावर मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये सुमारे सहा गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न अशी अनेक प्रकरणे आहेत. एनसीबीच्या दोन प्रकरणात तो फरार होता.
एनसीबीने एजाज खानलाही अटक केली
ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अभिनेता एजाज खानलाही अटक केली आहे. ३० मार्च रोजी एजाज खान राजस्थानमधून मुंबईत दाखल झाला. मुंबईत येताच एनसीबीने त्यांना ताब्यात घेतले. एनसीबीच्या पथकाने एजाज खानच्या अंधेरी आणि लोखंडवाला येथे अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली.