कॉमेडियन भारती सिंह, पती हर्षविरुद्ध एनसीबीने दाखल केले २०० पानी आरोपपत्र; अडचणी वाढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:52 AM2022-10-30T06:52:12+5:302022-10-30T06:52:19+5:30
नोव्हेंबर २०२० मध्ये भारती व हर्षच्या घरी व कार्यालयात ८६.५० ग्रॅम गांजा सापडल्याने एनसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्यावर ड्रग्सप्रकरणी एनसीबीने २०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. २०२० मध्ये त्यांना एनसीबीने अटक केली होती. त्यांचा जामीन मंजूर झाल्याने ते सध्या कारागृहाबाहेर आहेत. भारती व हर्षने गांजा बाळगल्याचा व त्याचे सेवन केल्याचा संशय आल्याने एनसीबीने त्यांना २०२० मध्ये अटक केली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.
नोव्हेंबर २०२० मध्ये भारती व हर्षच्या घरी व कार्यालयात ८६.५० ग्रॅम गांजा सापडल्याने एनसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले.
दोघांवरही एनडीपीएस कायद्यातील काही तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान दोघांनीही गांजाचे सेवन करत असल्याची कबुली एनसीबीला दिली. एनसीबीच्या ताब्यात असलेल्या दोन ड्रग्स विक्रेत्यांची चौकशी केल्यानंतर भारती व हर्षचे नाव समोर आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हर्षने स्वत:साठी गांजा खरेदी करत असल्याचे एनसीबीला सांगितले. अटकेनंतर दोनच दिवसांनी दंडाधिकारी न्यायालयाने दोघांची जामिनावर सुटका केली.