अर्जुन राजपालला पुन्हा एनसीबीचे समन्स; उद्या होणार चौकशी
By पूनम अपराज | Published: December 15, 2020 04:32 PM2020-12-15T16:32:16+5:302020-12-15T16:32:47+5:30
Drug Case : अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.
मुंबई - पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने डोकं वर काढलं आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करणार आहे. अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे.
मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर अर्जुन रामपाल १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे आहे असे म्हणाला होता. ड्रग्जशी माझा काही संबंध नाही. परंतु एनसीबी या प्रकरणात जे काम करत आहे ते बरोबर आहे. एनसीबी चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये एनसीबीलाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे पुढे रामपाल म्हणाला होता.
मित्राला अटक
यापूर्वी एनसीबीच्या अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले होते की, अर्जुन रामपालचा परदेशी मित्र पॉल गायार्ड याला एनसीबीने अटक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गायार्डला एनसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यापूर्वी एनसीबीने रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रायडिस हिच्याकडे सलग दोन दिवस चौकशी केली.
अर्जुन रामपालच्या घरावर छापे
९ नोव्हेंबर रोजी छापा टाकताना तपास यंत्रणेने अर्जुन रामपालच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅबलेटसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले आणि अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी केली. रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला अटक केली होती. जुहू येथील फिरोज यांच्या निवासस्थानी गांजा असल्याचे आढळून आले असल्याची ही कारवाई करण्यात आली.
गर्लफ्रेंडच्या भावाला अटक
यापूर्वी गैब्रिएला डेमेट्रायडिसचा भाऊ अॅगिसिओसच्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्ज सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात, एनसीबीने नशेच्या प्रकरणात गैब्रिएलाचा भाऊ अॅगिसिलोस डेमेट्रिएडसला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून अटक केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.
अभिनेता अर्जुन राजपालच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी चौकशीसाठी पुन्हा एनसीबीचे समन्स, १६ डिसेंबरला होणार चौकशी pic.twitter.com/eZWcpWuZag
— Lokmat (@MiLOKMAT) December 15, 2020