मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 10:52 AM2022-10-07T10:52:53+5:302022-10-07T11:06:15+5:30
एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली आहे
मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) पुन्हा एकदा ड्रग्ज माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि गुजरातमधून 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 60 किलो मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले असून ६ जणांना अटकही केली आहे. त्यामध्ये, एअर इंडियाच्या माजी पायलटसह इतर ड्रग्ज माफियांचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठेत या 60 किलो एमडी ड्रग्जची किंमत 120 कोटी इतकी आहे .
एनसीबी मुंबई , जामनगर नेव्हल युनिट, एनसीबी जामनगर यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. या प्रकरणी एकूण ६ जणांना अटक केली असून यातील ३ मुंबई तर १ जामनगरमधील आहे. मुंबई आणि गुजरात राज्यात हे रॅकेट सक्रिय झाले होते. या कारवाईत मुंबईतून ५० किलो आणि गुजरताच्या जामनगरमधून 10 किलो एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. जामनगरमधून सोहेल गफार रहीदा याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडिया विमानात पायलट होता. मात्र, त्याने एअर इंडियातील नोकरी सोडल्यानंतर ड्रग्ज माफियांसोबत धंदा सुरू केला होता. सोहेलने अमेरिकेतून पाललटचे प्रशिक्षण घेतले होते.