NCB ची सर्वात मोठी कारवाई; कोट्यवधी रुपयांचे LSD ड्रग जप्त, मोठ्या सिंडिकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 03:21 PM2023-06-06T15:21:50+5:302023-06-06T15:22:17+5:30
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने 14,961 LSD ब्लॉट्ससह 6 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
LSD Seizure: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीला मोठे यश मिळाले आहे. एनसीबीने दिल्ली-एनसीआरसह राजस्थानमधील जयपूर येथून एलएसडीची मोठी खेप जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या औषधांची किंमत करोडो रुपये आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील एलएसडीची ही सर्वात मोठी खेप असल्याचे सांगितले जात आहे. एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, गामागोबलिन आणि होली स्पिरिट ऑफ असुरचे 14,961 ब्लॉट्स अर्थात स्टॅम्प जप्त केले आहेत.
एलएसडीचे व्यावसायिक प्रमाण 6 ब्लॉट्स म्हणजेच सुमारे 0.1 ग्रॅम आहे, परंतु जप्त केलेला माल यापेक्षा 2,500 पट जास्त आहे. एलएसडी हे आजकाल भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या ड्रग्जपैकी एक आहे, ज्याचे तरुण मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांमध्ये सेवन करतात. असे मानले जाते की हे औषध घेतल्यानंतर वेगवेगळे आवाज आणि रंग दिसतात. यामुळेच आजकालची तरुणाई या ड्रग्जचे सर्वाधिक सेवन करत आहे, पण जर त्याचे प्रमाण जास्त झाले तर ते घातक ठरू शकते.
LSD सिंडिकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक
एनसीबीच्या दिल्ली झोनने देशभरातील सिंडिकेटचा भंडाफोड केला आहे. हे सिंडिकेट एलएसडी ड्रग्जची तस्करी करण्यासाठी डार्कनेट, सोशल मीडिया, क्रिप्टोकरन्सी, कुरिअर आणि इंडिया पोस्टचा वापर करत होते. या सिंडिकेटशी संबंधित 6 जणांना दिल्ली, ग्रेटर नोएडा आणि जयपूरमधून अटक करण्यात आली आहे. एका महिलेचाही यात समावेश आहे. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, या सिंडिकेटचा सर्वात मोठा सप्लायर आणि मास्टरमाइंड जयपूरचा रहिवासी आहे.
NCB ने छाप्यात 15000 LSD ब्लॉट जप्त केले
या छाप्यात एनसीबीने सुमारे 15 हजार एलएसडी ब्लॉट अर्थात स्टॅम्प जप्त केले आहेत. या पेपर ब्लॉटमध्ये एलएसडी द्रवपदार्थाच्या स्वरूपात पेस्ट केला जातो. एलएसडीचे हे ब्लॉट्स अमेरिका, नेदरलंड, पोलंड यांसारख्या देशांतून पोस्ट किंवा कुरिअरद्वारे या सिंडिकेटपर्यंत पोहोचत होते. या सिंडिकेटकडून आतापर्यंत एकूण 14,961 एलएसडी ब्लॉट्स आणि 2.232 किलो गांजासह 4.65 लाख रुपये जप्त करण्यात आले असून ड्रग मनी असलेली बँक खाती गोठवण्यात आली आहेत.