Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 11:28 AM2024-10-13T11:28:10+5:302024-10-13T11:29:15+5:30
NCP Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी शूटर्सना एडवान्स पेमेंट करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधित तपास करत असून मोठे खुलासे सातत्याने होत आहेत. बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी शूटर्सना एडवान्स पेमेंट करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मात्र, हे पेमेंट नेमकं किती होतं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शूटर्स गेल्या अनेक दिवसांपासून बाबा सिद्दिकी यांचं घर आणि त्यांच्या कार्यालयाची रेकी करत होते. काही दिवसांपूर्वी शूटर्सना एका आर्म्स डीलरने कुरिअर एजंटच्या मदतीने पिस्तूल दिलं होतं. या पिस्तूलसाठी आधीच पैसे दिले होते.
चौकशीत पोलिसांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी एका महिन्यापूर्वीच मुंबईत आले होते आणि शहरातील कुर्ला परिसरात राहत होते. याआधीही शूटर्सनी अनेकवेळा गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते अयशस्वी ठरले. दसऱ्याच्या दिवशी संधी मिळताच शनिवारी रात्री त्यांनी गोळीबार केला.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले शूटर्स हे लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे काउंटर इंटेलिजन्स युनिटही मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्हे शाखेला सांगितलं की, ते पंजाबमधील तुरुंगात होते, तेव्हा त्यांची बिश्नोई गँगमधील सदस्याशी ओळख झाली. या चार आरोपींपैकी तीन आरोपी हे पंजाबमधीलतुरुंगात होते. तिथे आधीपासून तुरुंगात असलेल्या बिश्नोई टोळीच्या सदस्याशी शूटर्सची ओळख झाली. त्यामुळे त्यानंतर तिन्ही आरोपी हे देखील लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये सामील झाले. यानंतर आरोपींनी बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यासाठी अडीच लाख रुपयांची सुपारी घेतली.