Nawab Malik: कालीचरण प्रकरणी मंत्री नवाब मलिकांना धमकी; राष्ट्रवादीने केली कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:20 AM2022-01-04T11:20:49+5:302022-01-04T11:21:40+5:30
नवाब मलिक धमकी प्रकरणाकडे गांभिर्याने पाहावे आणि योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
मुंबई: रायपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या अतिशय आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मोठी खळबळ उडाली. देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी कालीचरण महाराजावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर आता या प्रकरणी नवाब मलिक यांना धमकी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. नवाब मलिक यांना देण्यात आलेल्या धमकीप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एका युझरने केलेले ट्विट शेअर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री असलेल्या नवाब मलिक यांना धमकी असल्याचे थेट दिसून येत आहे. यामध्ये महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सतेज पाटील आणि ट्विटर इंडिया यांना टॅग करून या प्रकाराकडे गांभिर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काय म्हटले आहे त्या ट्विटमध्ये?
क्लाइड क्रास्टो यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये, हिंदुंना शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे ज्ञान असते. आणि कशाचा उपयोग कधी आणि कुठे करावा, हे ती ती वेळ ठरवत असते. बाकी कबाडी वाले आणि पंक्चर वाले यांना हे समजणार नाही, असे म्हटले आहे. या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला असून, नवाब मलिक यांना ही धमकी असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.
काय म्हणाले होते नवाब मलिक?
अकोल्याचा कालीचरण महाराज हा फर्जीबाबा. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे. संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले... बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा... महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.
दरम्यान, धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. रायपूर पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यास १३ जानेवारीपर्यंत न्यायायलयीन कोठडीत पाठवले आहे. होते. तत्पूर्वी न्यायालयाने कालीचरणला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.