छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव
By दीप्ती देशमुख | Published: September 15, 2022 10:01 PM2022-09-15T22:01:00+5:302022-09-15T22:02:48+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट (PMLA) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांनी मनी लाँड्रिगच्या गुन्ह्यातून दोषमुक्तता करण्यासाठी विशेष न्यायालयात केला आहे. ACB ने महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यातून आपली दोषमुक्तता करण्यात आल्याने आता मनी लॉड्रिंगच्या आरोपातूनही दोषमुक्तता करावी, अशी मागणी पंकज व समीर भुजबळ यांनी केली आहे.
जर मूळ गुन्हा रद्द करण्यात आला असेल तर पीएमएलए अंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्ह्याअंतर्गत कारवाई होऊ शकत नाही, असे काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पीएमएलए नुसार, ईडीला एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असल्यास त्या व्यक्तीवर आधी अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असणे बंधनकारक आहे. समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याशिवाय अन्य आरोपी संजय जोशी, तन्वीर शेख, सत्यन केसरकर आणि राकेश धारप यांनीही दोषमुक्ततेसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा व नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने पंकज भुजबळ, समीर व अन्य जणांवर गुन्हा दाखल केला. छगन भुजबळ यांनाही ईडीने आरोपी केली आहे. मात्र, एसीबीने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात त्यांना अद्याप दोषमुक्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी मनी लॉड्रिंगप्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केलेला नाही. या अर्जावर विशेष न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ७ ऑक्टोबर रोजी ठेवली.