राष्ट्रवादी तालुकाध्यक्षाचा वीज अभियंत्यावर हल्ला; दाम्पत्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 09:35 PM2021-03-22T21:35:07+5:302021-03-22T21:35:41+5:30
Attack on Engineer : या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यवतमाळ : ऑगस्ट २०१९ पासून थकीत असलेल्या वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहायक वीज अभियंत्यावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरसिंग राजपूत उर्फ नरेश ठाकूर व त्यांच्या पत्नीने हल्ला केला. ही घटना सोमवारी दुपारी ४.३० वाजता आर्णी मार्गावरील वैद्यनगरमध्ये घडली. या प्रकरणी अभियंत्यांच्या तक्रारीवरून राजपूत दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक अभियंता ममता हेमके या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी नरेश ठाकूर यांच्या निवासस्थानी गेल्या. ठाकूर यांच्याकडे ४३ हजार ९०० रुपयाचे वीज बिल थकीत आहे. ते वसूल करण्यासाठी कारवाई करण्यात आली. या दरम्यान, ठाकूर व त्यांच्या पत्नी यांनी ममता हेमके यांच्यावर हल्ला केला. धक्काबुक्की करीत त्यांना हुसकावून लावले. या प्रकरणामुळे वीज पथक ठाकूर यांच्या घरुन परत आले. त्यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकरणाची तक्रार दिली. ममता हेमके यांच्या तक्रारीवरून नरसिंग राजपूत उर्फ नरेश ठाकूर व गायत्री राजपूत यांच्या विरोधात भादंवि ३५३, ३३२, १८९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. राजकीय पुढाऱ्यांकडेही वीज बिलाची मोठी रक्कम थकीत असल्याचे दिसून येते.