उत्तर-दक्षिणेतील दाेन्ही आराेपींचे नाव गंगाधरच, महाराष्ट्रातील भानगड काेणत्या गंगाधरची?
By राजकुमार जोंधळे | Published: July 11, 2024 10:32 PM2024-07-11T22:32:34+5:302024-07-11T22:32:50+5:30
गंगाधार जाळ्यात अडकला तरी तपास यंत्रणांसमाेर दाेन ‘गंगाधर’ने निर्माण केला संभ्रम
राजकुमार जाेंधळे, लातूर: ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एन्टरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याच्या आराेपाखाली गंगाधरला सीबीआयने अटक केली. गंगाधार जाळ्यात अडकला तरी तपास यंत्रणासमाेर दाेन्ही ‘गंगाधर’ने संभ्रम निर्माण केला आहे. नीट प्रकरणात सीबीआयने उत्तर अन् दक्षिण भारतातून गंगाधार नावाच्या दाेघांना अटक केली. महाराष्ट्रातील भानगड काेणत्या गंगाधरने केली आहे, याचा शाेध तपास यंत्रणा घेत आहे. लातूर आराेपींचा नेमका काेणा गंगाधरसाेबत संबंध आला, याची पडताळणी केली जात आहे.
नांदेड एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रारंभी लातुरातील तिघा संशयीतांची चाैकशी केली हाेती. दरम्यान, एका दिवसाच्या चाैकशीनंतर ‘नीट’मध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळल्याचे समाेर आले. यातूनच लातुरात चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला. यामध्ये लातुरातील तिघे अन् दिल्लीतील गंगाधर नावाच्या आराेपीचा समावेश आहे. दाखल गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान स्थानिक पाेलिस यंत्रणेसमाेर हाेते.
उत्तराखंडमधून घेतले ताब्यात
चाैघांपैकी दाेघा शिक्षकांना पाेलिसांनी तातडीने अटक केली. मध्यस्थ म्हणून चाैकशीतून समाेर आलेला इरण्णा काेनगलवार अद्यापी गुंगारा देत पसार आहे. दिल्लीतील गंगाधरच्या शाेधात लातूर पाेलिसांची पथके रवाना झाली हाेती. आठ-दहा दिवस उत्तर भारतात शाेध घेतल्यानंतरही ताे हाती लागला नाही. अखेर त्याला उत्तराखंडमधून सीबीआयने दाेन आठवड्यापूर्वीच ताब्यात घेतल्याचा दावा त्याच्या पत्नीने केला आहे. ताे मुळचा महाराष्ट्रातील असून, त्याचीही चाैकशी केली जात आहे.
सीबीआयचा हिसका अन् गंगाधारचा सुगावा
चार दिवसांपूर्वी सीबीआयने एन.गंगाधर अप्पा नावाच्या व्यक्तीला आंध्र प्रदेशातून अटक केली. ताे बंगळरु येथील सीबीआय काेठडीत हाेता. लातुरातील गुन्ह्यात सीबीआय पथकाने त्याला साेमवारी रात्री लातुरात आणले. आराेपींनी पाेलिसांना जबाबात सांगितलेला गंगाधर हा दिल्ली येथील असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर सीबीआयने चाैकशीदरम्यान आराेपींना चांगलाच हिसका दाखविला अन् माेबाईलमध्ये सेव्ह असलेल्या गंगाधारचे लाेकेशन आंध्र प्रदेशात निघाले. या दाेन्ही गंगाधारची चाैकशी केली जात असून, नीट प्रकरणाचा तपास केला जात आहे.
गंगाधरचा वावर किती राज्यामध्ये?
दिल्ली आणि आंध्र प्रदेशातील गंगाधारचा नेमका किती राज्यात वावर आहे, याची कसून चाैकशी तपास यंत्रणांकडून केली जात आहे. चाैकशीसाठी आंध्र प्रदेशातून लातुरात आणलेल्या गंगाधरची दाेन दिवसांपासून सीबीआयकडून झडती घेण्यात आली. त्याच्या कारमान्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याने ताेंड उघडले असून, एजंटांची नावेही सांगितल्याचे समाेर आले आहे.
पालक-विद्यार्थ्यांचे जबाब; चौकशीच्या फेऱ्यात अडकले...
दाहा दिवसांपासून लातुरात मुक्कामी असलेल्या सीबीआय पथकाने आराेपींच्या चाैकशीत, त्यांच्या माेबाईलमध्ये आढळून आलेल्या यादीतील पालक-विद्यार्थ्यांची चाैकशी सुरु केली आहे. जबाब नाेंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. लातूर जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील पालकांचा यामध्ये समावेश असून, हे पालक सध्याला सीबीआय चाैकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आतापर्यंत ३२ विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे आढळल्याचे समाेर आले आहे.