काकाचा खून करणाऱ्या पुतण्याला अटक; जेवणाच्या कारणावरून केला होता हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 10:18 PM2023-03-04T22:18:51+5:302023-03-04T22:19:11+5:30
याप्रकरणी किसन शंकर कुवर (७०) रा. जामोद यांनी तक्रार दिली. त्यामध्ये पुतण्या दीपक कुंवर हा त्यांच्या घरी १ मार्च रोजी आला होता.
जळगाव जामोद : काकाच्या घरी आलेल्या पुतण्याने जेवण मागितल्यानंतर दिलेल्या जेवणाचे ताट फेकून दिले. त्याचवेळी काकाला लाथाबक्क्याने मारहाण करत डोक्यात वीट मारली. जखमी काकाचा उपचारादरम्यान अकोल्यात मृत्यू झाला. याप्रकरणी तालुक्यातील जामोद येथील दीपक सुकदेव कुवर याच्यावर शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी किसन शंकर कुवर (७०) रा. जामोद यांनी तक्रार दिली. त्यामध्ये पुतण्या दीपक कुंवर हा त्यांच्या घरी १ मार्च रोजी आला होता. त्यावेळी त्याने जेवण मागितले. ते दिले असता जेवणाचे ताट फेकून देऊन त्याने शिवीगाळ केली. हा वाद सोडवण्यासाठी आलेले मधुकर शंकर कुवर (६५) या मोठ्या काकाच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन डोक्यात वीट मारली. जखमी मधुकर यांना जळगाव, खामगाव व नंतर अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान ३ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावरून दीपकविरुद्ध भादविच्या कलम ३०२,३२३,५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी दीपक सुखदेव कुवर (३३) रा. जामोद हा फरार झाला होता. आरोपी सुरत येथे जात असल्याची माहीती पोलिसांना मिळाल्याने ठाणेदार झांबरे यांनी मलकापूर शहरचे ठाणेदार रत्नपारखी यांना आरोपीचा फोटो व माहिती दिली. आरोपी हा मलकापूर रेल्वेस्थानकात असताना त्यास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश झांबरे, पोहेकॉ संजय राऊत, तैय्यबअली, श्रीराम निळे तसेच मलकापूर शहर व त्यांचा पोलीस स्टॉफ यांनी संयुक्तिकपणे केली.