मधाळ संवादाचे जाळे
By मनीषा म्हात्रे | Published: December 31, 2023 12:14 PM2023-12-31T12:14:34+5:302023-12-31T12:16:31+5:30
...काही दिवसांनी थेट सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून, गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या ६५ हजार रुपयांवर हात साफ केला.
मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी -
दादर परिसरात राहणारे ४६ वर्षीय ऑडिटर. काही दिवसांपूर्वी त्यांना पूजा नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनीही फेसबुकवरील त्या सुंदरीचा फोटो बघून ती स्वीकारली. संवाद सुरू झाला. याच ओळखीतून व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झाले. पुढे अश्लील संवाद सुरू हाेऊन रंगू लागला. तिने नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल केला. तेही तिच्या मोहात हरवून तशा स्थितीत आले. अवघ्या पाच मिनिटांतच कॉल कट झाला. त्यानंतर, दहाव्या मिनिटाला महिलेने त्यांच्यासोबतच्या अश्लील व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग शेअर करताच त्यांना धक्का बसला. हे व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत तिने पैसे मागण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी थेट सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून, गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यात त्यांच्या ६५ हजार रुपयांवर हात साफ केला.
अशाच प्रकारे सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे मधाळ संवादातून अश्लील व्हिडीओ कॉल करून समोरच्यालाही तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळ्यात येताच याच व्हिडीओच्या आधारे, खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीकडून उच्चशिक्षितांबरोबर राजकीय मंडळींनाही टार्गेट केले जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात अशी शेकडो प्रकरणे पोलिसांकडे आली आहेत.
एकट्या मुंबईत गेल्या ११ महिन्यांत ४९ गुन्हे नोंदवले गेले. मुंबईत नुकतेच शिवसेनेचे दोन आमदार या जाळ्यात अडकले होते. पहिल्या घटनेत बदनामीच्या भीतीने आमदाराने पैसेही दिले. मात्र, पुढे आणखी पैशांची मागणी होताच त्यांनी कुर्ला पोलिसांकडे तक्रार दिली. तर, दुसऱ्या घटनेत आमदाराने वेळीच सतर्क होत पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी पूजा शर्मा, नेहा शर्मा अशी नावे वापरून फसविण्यासाठी तयार केलेली १७१ फेसबुक प्रोफाइल पोलिसांनी ब्लॉक केली. याचप्रमाणे पाच टेलिग्राम चॅनेल्स आणि ५८ बँक खातीही ब्लॉक करण्यात पोलिसांना यश आले.
‘तो’ मुलगी बनून आमदारांंना करायचा अश्लील कॉल
मुंबईतील शिवसेना आमदारांना २० ऑक्टोबरच्या रात्री एक संदेश आला. तो राजस्थानमधील आरोपी मौसमदीन खान याने महिला बनून पाठवला होता. गप्पांमध्ये या व्यक्तीने आमदाराकडे मदत मागितली. काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडीओ कॉल आला. पुढे याच व्हिडीओद्वारे आमदारांना ब्लॅकमेल करून पाच हजार रुपये मागितले. सायबर पोलिसांनी भरतपूरच्या तेसकी गावातून मौसमदीनला अटक केली. त्याने अशाप्रकारे अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
...म्हणून सर्व सेंटिंग प्रायव्हेट ठेवा
सर्व सोशल मीडिया अकाउंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाउंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका.
अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल स्वीकारू नका. तो क्रमांक लगेच ब्लॉक करा. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन राज्य सायबर विभागाने केले आहे.