विद्यार्थ्यांकडून लाच स्वीकारणारा मुख्याध्यापकासह शिक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 08:11 PM2019-08-23T20:11:22+5:302019-08-23T20:15:04+5:30
१० हजाराची लाच : तुमसर तालुक्याच्या लोहारा येथे कारवाई
भंडारा - बारावीची परीक्षेचा १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी दोन विद्यार्थ्यांकडून दहा हजार रूपयांची लाच घेताना तुमसर तालुक्यातील लोहारा येथील रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकासह शिक्षकाला शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली. यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्याध्यापक शिवनारायण जयराम राणे (५४) आणि सहाय्यक शिक्षक बाबुलाल मोतीराम पटले असे लाचखोर शिक्षकांची नावे आहे. ते दोघेही लोहारी येथील रतीराम टेंभरे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत आहेत. सदर तक्रारदार हा लोहार येथीलच रहिवासी आहे. तक्रारदार आणि त्याच्या मित्राने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु काही कारणांनी ११ वीमध्ये प्रवेश घेतला नाही. त्यामुळे १७ नंबरचा फॉर्म भरून बारावीची परीक्षा देण्यासाठी ते रतीराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना भेटले. त्यावेळी मुख्याध्यापक शिवनाराण राणे यांनी १७ नंबरचा फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रूपये असे दहा हजार रूपये लाचेची मागणी केली.
यावरून भंडारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार करण्यात आली. पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी या तक्रारीची गोपनीयरित्या शहनिशा केली. त्यानंतर शुक्रवारी रतिराम टेंभरे कनिष्ठ महाविद्यालयात सापळा रचण्यात आला. दोन विद्यार्थ्यांकडून दहा हजार रूपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
शिवनारायण राणे व बाबुलाल पटेल यांच्याविरूद्ध आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुध्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक महेश चाटे, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, अश्विन गोस्वामी, पराग राऊत यांनी केली.
भंडारा - विद्यार्थ्यांकडून लाच स्वीकारणारे मुख्याध्यापकासह शिक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 23, 2019