धक्कादायक! वर्षभरात 8 मुलांवर लावले बलात्काराचे आरोप, 'ब्लॅकमेल गर्ल' पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 03:31 PM2021-12-30T15:31:29+5:302021-12-30T15:31:38+5:30
तरुणी डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून लाखो रुपये वसुली करायची. या सर्व कामात त्या तरुणीची आईदेखील तिला मदत करायची.
नवी दिल्ली:दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वसुल करणाऱ्या तरुणीला अटक करण्यात पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.
आई करायची मदत
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू कॉलनी पोलिसांनी बलात्काराचे खोटे आरोप करुन मुलांना लुटणाऱ्या 20 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात या तरुणीच्या ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या खेळाचा भांडाफोड झाला. या साऱ्या खेळात अटक करण्यात आलेल्या मुलीची आई आणि तिचा साथीदारही सामील होता. सध्या, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गुरुग्रामचे एसीपी क्राइम प्रीतपाल सिंह यांनी ही माहिती दिली आहे.
अशी करायची फसवणूक
मुलीच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित मुलाने सांगितले की, 20 ऑगस्ट रोजी तो डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणीला भेटला. मुलीने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्याच्याशी शारिरीक संबंध ठेवले. 23 ऑगस्टपर्यंत त्याला मजबूर करुन तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. ही गोष्ट इथेच थांबली नाही, तर सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पद्धतशीरपणे इतर काही तरुणांना अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळले. या सगळ्यातून तरुणीने लाखोंची वसुली केली आहे.
पोलिसांत खोटे गुन्हे दाखल
पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी तरुणीने राजेंद्र पार्क, न्यू कॉलनी, ठाणे शहर, ठाणे सदर, सेक्टर 10, सिव्हिल लाइन्स, डीएलएफ फेज-1 आणि सायबर क्राइम पोलिसांत वर्षभरात एकूण 7 तरुणांविरुद्ध बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलिस तपासात दोन प्रकरणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तरुणीने 15 महिन्यांत 8 जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.