नवी दिल्ली, गोव्यासह मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांचा सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 04:17 PM2019-03-25T16:17:46+5:302019-03-25T16:20:04+5:30
दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो, अशी देखील माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
नवी दिल्ली - नवी दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची इस्लामिक स्टेट (आयएस) आणि अल - कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली, मुंबई, गोवा पोलिसांना अलर्ट जारी केला आहे. न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने आयएस आणि अल - कायदा या दोन संघटना ज्यू धर्मियांच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. येत्या चार दिवसांत हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. दहशतवाद्यांकडून हल्ल्यासाठी वाहनांचा वापर होऊ शकतो, अशी देखील माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
नवी दिल्ली, मुंबई आणि गोव्यात दहशतवादी हल्ले घडवण्याची इस्लामिक स्टेट (आयएस) आणि अल - कायदा या दहशतवादी संघटनांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 25, 2019
याबाबत गुप्तचर यंत्रणांना विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयएस या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता अबू हसन अल - मुहाझीर याची न्यूझीलंडमधील हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप दहशतवाद्यांच्या ऑनलाइन ग्रुप आणि विविध चॅट प्लॅटफॉर्मवर वायरल करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपसह दहशतवादी संघटनांच्या समर्थकांनीही असा बदला घेण्याला दुजोरा दिलेले व्हिडिओही दहशतवाद्यांमध्ये वायरल करण्यात आले आहेत.