तोतया पोलिसांचा नवा फंडा ; चक्क १२ कोटींना घातला गंडा, ९ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 01:29 AM2021-02-21T01:29:15+5:302021-02-21T01:29:27+5:30
विलेपार्लेच्या बावा इंटरनॅशनलमधील प्रकार; पैशांची बॅग घेऊन पसार
मुंबई : एक पंचतारांकित हॉटेल, त्यात १२ कोटी रुपये घेऊन आलेले दोन व्यावसायिक, त्यांच्यासोबत व्यवहार करणारे एजंट, त्यांना लुटण्यासाठी दबा धरून बसलेली एक तोतया पोलिसांची टोळी, त्यांना साथ करणारी बाहेरची दुसरी टोळी...काही मिनिटांत चोरी करून लंपास झालेली गँग... नऊजणांना झालेली अटक... हे कोणत्याही हिंदी मसाला चित्रपटाचे कथानक नाही, तर मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या गुन्ह्याची हकीकत आहे.
विलेपार्ले पूर्व नेहरू रोडवर असलेल्या हॉटेल बावा इंटरनॅशनलच्या एका खोलीत मुंबई बाहेरून आलेले दोन व्यापारी काही लोकांना भेटण्यासाठी थांबले होते. १७ फेब्रुवारी रोजी पैशांचे व्यवहार सुरू होते. दुपारी चारच्यासुमारास स्वतःला पोलीस म्हणवणारे पाचजण त्यांच्या खोलीत शिरले. त्या पाचजणांनी या व्यापाऱ्यांकडील पैशाची बॅग हिसकावली आणि पळ काढला. त्यावेळी झालेल्या झटापटीत व्यवहारासाठी त्या खोलीत हजर असलेला मध्यस्थ आनंद इंगळे आणि त्या दोन व्यापाऱ्यांना मारहाण झाली.
इंगळे मानखुर्दचा असून, वीज कंपनीमध्ये लेबर पुरविण्याचे काम करतो. त्याने केलेल्या तक्रारीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज शोधले. तसेच स्थानिक खबऱ्यांना कामाला लावले आणि शनिवारी रात्रीपर्यंत या गुन्ह्याशी संबंध असलेल्या नऊजणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात यश मिळवले.
पोलिसांनी नेमके कोणाला अटक केले, त्यांचा या गुन्ह्यात कसा आणि किती सहभाग होता, याबद्दल काहीही माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दाखवली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून काही रक्कमदेखील हस्तगत करण्यात आली आहे. त्यांचा एक साथीदार फरार आहे.
...म्हणून सुरक्षा यंत्रणा राहिली गाफील
हॉटेलमध्ये शिरलेल्या त्या पाच जणांनी गेटवरील सुरक्षारक्षकांना आपण पोलीस असल्याचे सांगितले आणि बनावट ओळखपत्रही दाखवले. त्यामुळे त्यांचा हॉटेलातील प्रवेश सोपा झाला.
‘त्यांचा’ फसविण्याचा होता उद्देश!
दोघा व्यावसायिकांचे १२ कोटी रुपये सफेद करून देतो, असे सांगत हॉटेलमध्ये बोलावून घेणाऱ्यांचा उद्देशदेखील त्यांना फसविण्याचाच होता. मात्र, त्या आधीच तोतया पोलिसांनी पैसे उडवले.