NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 09:07 PM2024-10-26T21:07:43+5:302024-10-26T21:08:16+5:30
आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे.
मुंबई - राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेने नवा खुलासा केला आहे. या गोळीबारातील ३ आरोपी गुरमैल सिंह, धर्मेंद्र कश्यप आणि शिवकुमार हे लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ अनमोल बिश्नोईच्या सातत्याने संपर्कात होते. ते स्नॅपचॅटच्या माध्यमातून संवाद साधायचे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. या कटात सहभागी असणाऱ्यांकडून ४ फोन जप्त केलेत. या फोनच्या पडताळणीत हत्येच्या आधी आरोपी अनमोलच्या संपर्कात असल्याचं पुढे आले आहे.
क्राइम ब्रांचच्या सूत्रांनुसार, ज्या ३ हल्लेखोरांनी गोळीबार केला ते तिघेही वेगवेगळ्या वेळी अनमोल बिश्नोईशी स्नॅपचॅटवर बोलत होते. हा पहिलाच पुरावा पोलिसांसमोर आलाय, ज्यात बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा थेट लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलशी कनेक्शन होते. याच वर्षी एप्रिल महिन्यात अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सीवर करण्यात आलेल्या गोळीबारात अनमोल बिश्नोई फरार होता. आतापर्यंतच्या तपासात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यांपैकी मुख्य शिवकुमार असल्याचे उघड झाले आहे.
गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार, तीन शूटर्सशिवाय पुण्यातून अटक करण्यात आलेला प्रविण लोणकर हा अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच NIA ने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिष्णोईला पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी गोळीबार प्रकरण आणि आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई शूटरच्या संपर्कात असल्याच्या पुराव्यानंतर एनआयएने ही पावले उचलली आहेत. एनआयए आधीच अनमोल बिश्नोईचा शोध घेत आहे. सिद्धू मूसवाला खून प्रकरणानंतर तो फरार झाला होता.
अनमोलला केनियात पाहिल्याची खबर लागली होती. त्यानंतर २ वर्षांनी एप्रिल २०२३ साली अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात बेकर्सफिल्डमध्ये अनमोल बिश्नोई एका कार्यक्रमात दिसला होता. पंजाबी गायक औजला आणि शेरीमान यांच्या कार्यक्रमात अनमोल स्टेजवर सेल्फी घेताना सोशल मीडियात फोटो समोर आला. अनमोलच्या सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमध्ये आयपी एड्रेस तपासला असता तो पोर्तुगालचा समोर आला. तो अमेरिकेत कुठेतरी लपल्याची माहिती असून नेहमी कॅनडाला जात असल्याचेही समजलं आहे.