सुशील कुमार आरोपी असलेल्या सागर धनखड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 01:49 PM2021-06-15T13:49:27+5:302021-06-15T13:49:27+5:30
Sagar Dhankhad murder case: पैलवान सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Sushil Kumar) सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे.
नवी दिल्ली - पैलवान सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपाखाली ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटूसुशील कुमार (Sushil Kumar) सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, त्यामध्ये आतापर्यंत गँगस्टर कनेक्शन समोर आले आहे. मात्र आता तपासामधून अधिक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी सांगितले की, एका सेल्फीमुळे या सर्वांमधील मैत्री दुश्मनीत बदलली आणि पुढे हे हत्याकांड घडले. (A new twist has come to the fore in the Sagar Dhankhad murder case in which Sushil Kumar is accused)
सूत्रांनी सांगितले की, सुशील कुमार याच्या फ्लॅटवर सोनू महालच्या गर्लफ्रेंडवरून वाद झाली. ती युक्रेनमधील आहे. तसेच ती सोनूची फेसबूक फ्रेंडही आहे. सोनूने त्या मुलीचा फोटो फ्लॅटच्या भिंतीवर लावला होता. वाढदिवसादिवशी अजय बजरवाला दारूच्या नशेत फ्लॅटवर आला. त्याने मुलीच्या फोटोसोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. याची माहिती जेव्हा सोनूला समजली तेव्हा त्याने रागारागात अजयसोबतच सुशील कुमारलाही शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही गटांत वाद वाढला.
सूत्रांनी सांगितले की, या वादानंतर सागर धनखडसुद्धा सुशीलला सोडून दुसऱ्या आखाड्यात जाऊ लागला. सारग धनखड हा सुशीलचा खूप निकटवर्तीय समजला जात असे आणि सोनूचीही अजयसोबत चांगली दोस्ती होती. मात्र एका सेल्फीमुळे असा वाद झाला ही ही मैत्री कट्टर शत्रुत्वात बदलली. त्यानंतर दोन्ही गटात दररोज वाद होऊ लागला आणि त्याची परिणती अखेर सागरच्या हत्येत झाली.
दरम्यान, ४ आणी ५ मेच्या रात्री दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील कुमार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पोहोचला. तिथे त्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये पैलवान सागर धनखड गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर पुढच्याच दिवशी सुशील कुमार फरार झाला होता.
दरम्यान, १७ दिवसांनंतर २३ मे रोजी सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. दरम्यान, या हत्याकांडाशी संबंधित अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.