धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:37 AM2024-11-26T11:37:56+5:302024-11-26T11:38:40+5:30
कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सनी नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणवून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा रुग्णालयातून बनावट नर्सनी नवजात बाळाचं अपहरण केलं. स्वतःला नर्स म्हणवून घेणाऱ्या दोन महिलांनी नवजात बाळाचं अपहरण केलं. रुग्णालयाच्या ११५ वॉर्डमध्ये २५ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता एका बाळाचा जन्म झाला.
संशयित महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या युनिफॉर्ममध्ये कुटुंबाकडे आल्या आणि बाळाला ब्लड टेस्टसाठी घेऊन जावं लागेल, असं सांगितलं. घरच्यांनी बाळाला तिच्याकडे दिलं पण तिने ते बाळ परत आणलं नाही. बाळाचे पालक रामकृष्ण आणि कस्तुरी हे सय्यद चिंचोली गावचे रहिवासी आहेत. याप्रकरणी ब्रह्मपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिला नवजात बाळाला घेऊन रुग्णालयाबाहेर पळताना दिसत आहेत. फुटेजमध्ये दोन महिलांपैकी एकाने तोंडावर मास्क लावलेला आहे तर दुसरीने एका मुलाला आपल्या कुशीत घेतलेलं दिसत आहे. दोघीही काही वेळ हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याची ही पहिलीच घटना नसून अशी अनेक घटना घडल्या आहेत. यावर्षी सीबीआय आणि पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील केशव पुरम भागातील एका घरावर छापा टाकला होता. दोन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर सीबीआयने मानवी तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश करत ७ ते ८ नवजात बाळांची सुटका केली.
सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपासात समोर आलं आहे की, आरोपी फेसबुक पेज आणि व्हॉट्सॲप ग्रुप्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिराती करत असे. याद्वारे ते मूल दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या निपुत्रिक जोडप्यांशी संपर्क साधत असत. यानंतर आरोपी नवजात बाळांना चार ते सहा लाख रुपयांना विकायचे.