धक्कादायक! लग्नाआधी ४ वर्ष प्रेमसंबंध; लग्नानंतर अवघ्या ४ दिवसांत पती-पत्नीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 02:20 PM2020-07-05T14:20:34+5:302020-07-05T14:22:49+5:30
प्रेमविवाहानंतर ४ दिवसांत दाम्पत्याची आत्महत्या; पतीची ट्रेनसमोर उडी, पत्नीनं घेतला गळफास
गाझियाबाद: दिल्लीजवळील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाहानंतर अवघ्या चार दिवसांत दाम्पत्यानं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीनं रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पत्नीनं पत्नीनं गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. चार वर्षांच्या प्रेमानंतर दोघांनी अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्यानं दोघांच्याही कुटुंबांना धक्का बसला आहे.
गाझियाबादमधल्या कवीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपुरममध्ये वास्तव्यास असलेल्या दाम्पत्यानं लग्नाच्या अवघ्या चार दिवसांनंतर आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव विशाल असून तो कोचिंग सेंटरमध्ये कॉमर्स क्लास चालवायचा. तर त्याची पत्नी बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर मॅनेजर होती. २९ जूनला दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीनं ते विवाहबंधनात अडकले. दोघे लग्नात अतिशय आनंदात दिसत होते.
लग्नानंतरचे सर्व विधी आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडला. तो संध्याकाळपर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांना याबद्दलची माहिती दिली. विशालचा फोनदेखील घरीच होता. पोलिसांनी विशालचा फोटो घेऊन तपास सुरू केला. अवघ्या काही वेळातच पोलिसांना एक मृतदेह सापडला. तो मृतदेह विशालचा असल्याचं समोर आलं.
विशालच्या आत्महत्येमुळे निशाच्या कुटुंबीयांनादेखील धक्का बसला. निशाच्या भावानं विशालच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानं निशाकडे याबद्दल विचारणा केली. मात्र विशालच्या मृत्यूनं तिला जबर हादरा बसला होता. ती कोणाकडेच काही बोलली नाही. तिनं रात्री गळफास लावून आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला. लग्नाआधी ४ वर्षे प्रेमसंबंध असलेल्या निशा आणि विशालनं उचललेल्या टोकांच्या पावलांमुळे दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.