सर्जिकल स्ट्राइकची बातमी लीक! टीप मिळाल्यानेच नागपुरातून पळाले बुकी; 'या' बड्या शहरांत आहेत अड्डे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 12:07 AM2021-10-26T00:07:46+5:302021-10-26T00:08:55+5:30
जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते.
नागपूर: एकाचवेळी बहुतांश मोठ्या बुकींवर पोलीस हात टाकणार आहेत, अशी माहिती लीक झाल्यामुळे कारवाईपूर्वीच शहरातील सर्वच बडे बुकी नागपूरबाहेर पळून गेले. त्यांच्यातील काहींनी गोवा, काहींनी मुंबई, तर काहींनी परप्रांतात धाव घेत आपले अड्डे सुरू केले.
नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये क्रिकेट सट्ट्याचे अड्डे थाटून बुकींनी कोट्यवधींची लगवाडी खयवाडी चालविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने यापूर्वी वेळोवेळी प्रकाशित केले. या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांनी शहरातील ‘बुकींवर सर्जिकल स्ट्राइक’ करण्याची योजना बनविली होती. त्यानुसार, टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्याला रविवारी सुरुवात झाली आणि पोलिसांनी एकाच वेळी अनेक बड्या बुकींकडे छापेमारी केली. मात्र, कोणताही मोठा बुकी पोलिसांच्या हाती लागला नाही. पोलिसांच्या हाती फिरोज रफिक शेख (वय ४९, रा. शुक्रवारी तलावाजवळ, गणेशपेठ), पीयूष अग्रवाल (वय ३६, रा. लकडगंज), अशोक ऊर्फ गुप्ता ऊर्फ तुलसीराम गुप्ता, राहुल रमेश अग्रवाल (वय ४६, रा. बजेरिया, गणेश पेठ), प्रवीणकुमार ऊर्फ चिंटू चाैरसिया (वय ३२, रा. गड्डीगोदाम) आणि सोनू चहांदे (वय ४५, रा. गड्डीगोदाम) हे सहा बुकी सापडले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि उपायुक्त चिन्मय पंडित यांनी उपरोक्त बुकींची मध्यरात्रीपर्यंत ‘खास खातीरदारी’ केली. त्यांच्याकडून ‘बुकी बाजाराबाबत’ महत्त्वाची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मोकळे करण्यात आले. तत्पूर्वी पोलीस धडाकेबाज कारवाई करणार असल्याचे कळाल्याने बड्या बुकींपैकी कमाल जहांगिरने गोवा, सिराज खानने बांद्रा (मुंबई), अर्जुन राजपूतने खार (मुंबई), बंटी, कमनानी, पंकज कडी, सोनू परीने अकोल्यात आश्रय शोधला, तर मनीष, बंटी ज्यूस, बॅटरी गुल, अतुल धरमपेठ तोतवणीसह अनेक बडे बुकी शहर सोडून वेगवेगळ्या शहरात पळून गेले. काहींनी रायपूर, भोपाळ, पांढुरण्याकडे धाव घेतली.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मोजक्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांना बुकींवर सर्जिकल स्ट्राइक करणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, ठिकठिकाणी छापेमारीही झाली मात्र कोणताही मोठा बुकी पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे दलातील घरभेद्यानेच बुकींना कारवाई होणार असल्याची माहिती कळवली असावी, असा संशय आहे. त्याचीही वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार पोलीस आता पुढच्या कारवाईची व्यूहरचना करणार आहेत.
अलेक्झांडर सेमिनरी हिलमधून गायब -
जरीपटका, खामला, इतवारी, वर्धमाननगरमध्ये असलेले अनेक बुकी रविवारी दुपारपर्यंत आपापल्या एजंटस्कडून आपापल्या अड्ड्यावर भारत - पाकिस्तान सामन्याच्या खयवाडीची तयारी करून घेत होते. मध्य भारतातील टॉप टेनमध्ये गणना होणारा कुख्यात बुकी अलेक्झांडर दुपारी सेमिनरी हिल्स परिसरात होता. ३ वाजताच्या सुमारास त्याला कारवाई होणार असल्याची भनक लागली. त्यामुळे तो आणि त्याच्यासारखेच अनेक बडे बुकी आपापले मोबाइल बंद करून शहरातून गायब झाले. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी रात्री ११ वाजेपर्यंत प्रयत्न केले. मात्र ते हाती लागले नाही.