पुढचे 72 तास निर्णायक, पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्याचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 05:53 PM2019-02-27T17:53:58+5:302019-02-27T17:55:33+5:30
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले.
इस्लामाबाद - भारतीय हवाई दलाने (IAF) मंगळवारी मध्यरात्री नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. या कारवाईमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद अहमद यांनी आज युद्ध झाल्यास हे तिसरे आणि शेवटचे युद्ध असेल अशी धमकी देत पुढील ७२ तास निर्णायक असतील असे शेख यांनी सांगितले.
शेख यांनी पुढे सांगितले की, "हे एक भयानक युद्ध असेल कारण पाकिस्तान पूर्णपणे तयार आहे. पाकिस्तानात जवळजवळ युद्धजन्य स्थितीत आहे. रेल्वे आधीच आपत्कालीन परिस्थितीच्या कायद्यांचे पालन करीत आहे, "असे ते म्हणाले. जर युद्ध झालंच तर दुसऱ्या युद्धापेक्षा हे सर्वात मोठं आणि अंतिम युद्ध असेल अशी माहिती शेख यांनी दिली. येत्या ७२ तासांत शांततेचा पवित्रा घेणार की युद्ध पुकारणार याबाबत निर्णय घेण्यात येईल असे शेख पुढे म्हणाले.