‘इसिस’विरोधात एनआयएची छापेमारी; महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये १३ ठिकाणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:23 AM2022-08-01T07:23:18+5:302022-08-01T07:23:29+5:30
एका संघटनेच्या घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळून लावल्याचा दावा बिहार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये १३ ठिकाणी रविवारी छापे टाकले. महाराष्ट्रात नांदेड व कोल्हापूर जिल्ह्यांत एनआयएने कारवाई केली. या ठिकाणांहून एनआयएने अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त केल्या. उत्तर प्रदेशमधील देवबंद येथून मदरशातील एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
एका संघटनेच्या घातपाती कारवाया करण्याचा डाव उधळून लावल्याचा दावा बिहार पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक केली होती. त्यातील काही आरोपी पाटण्यातील फुलवारी शरीफ भागातील रहिवासी आहेत. या सर्व घडामोडींबाबत एनआयएने २५ जूनला गुन्हा दाखल केला होता. फुलवारी शरीफ येथून मिळालेल्या माहितीनंतर तीन दिवसांपूर्वी एनआयएने बिहारमधील पाटणा, दरभंगा, मोतीहारी, नालंदा, अररिया, मधुबनी येथे छापे टाकले होते.
या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एनआयएने रविवारी मध्य प्रदेशातील भोपाळ, रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी, अहमदाबाद जिल्हे; बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ, तुमकूर, महाराष्ट्रातील कोल्हापूर, नांदेड जिल्हा, उत्तर प्रदेशमधील देवबंद येथे छापे टाकले. गुजरातमध्ये एनआयए तिघा जणांची चौकशी करीत आहे. देशात घातपाती कारवाया करण्याचा इसिस संघटनेचा डाव असून, तिच्याशी काही लोक संलग्न आहेत.
नांदेड, कोल्हापूरमध्ये चौकशी
एनआयएने नांदेडमध्ये देगलूर नाका परिसरातील पहाटे चार वाजता तिघांना ताब्यात घेतले होते. त्यात एका धर्मगुरूचा समावेश आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे एका घरावर छापा टाकून तिथे पाच तास झडती घेतली. सख्खे भाऊ असलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सहा तास चौकशी केली. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. ज्या दोन भावांची चौकशी केली, ते लब्बैक इमदाद फाउंडेशन ही संस्था चालवितात. संतप्त जमावाने रविवारी सायंकाळी या संस्थेच्या कार्यालयावर दगडफेक करीत साहित्य रस्त्यावर फेकून दिले.
ताब्यात घेतलेला आयएसआयच्या संपर्कात?
उत्तर प्रदेशातील देवबंद येथे मदरशातील एका विद्यार्थ्याला एनआयएने ताब्यात घेतले आहे. फारुक असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो कर्नाटकचा मूळ रहिवासी आहे. त्याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. फारुकला अनेक भाषा येतात व तो पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी एका सोशल मीडिया ॲपद्वारे संपर्कात होता असे समजते. याआधी २३ जूनला मुजिबुल्ला या रोहिंग्या जमातीतील विद्यार्थ्याला देवबंदमधून अटक करण्यात आली होती.