एनआयएचा नेरुळसह पनवेलमध्ये छापा; पीएफआयच्या कार्यालयाची झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 08:19 PM2022-09-22T20:19:24+5:302022-09-22T20:19:36+5:30
पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दहशतवादांना रसद पुरवल्याच्या संशयातून एनआयएकडून देशभरातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापे टाकले जात आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी नेरुळमधील पीएफआयच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सुमारे आठ तासाच्या झाडाझडती नंतर अधिक तपासासाठी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. तर पनवेलमधून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केरळ मध्ये टाकलेल्या छाप्यानंतर महाराष्ट्रातील देखील पीएफआयच्या कार्यालयांवर गुरुवारी पहाटे छापे टाकले. त्यात नेरुळ सेक्टर २३ मधील कार्यालयावर देखील एनआयएचे पथक धडकले. नेरूळच्या पीएफआयची जबाबदारी सांभाळणाऱ्या आसिफ शेख यांना पहाटे ४ च्या सुमारास घरातून ताब्यात घेऊन कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी पहाटे ५ ते दुपारी १ पर्यंत कागदपत्रांची झाडाझडती सुरु होती. त्यानंतर मोठया प्रमाणात कागदपत्रे सोबत घेऊन एनआयएच्या पथकाने दुपारी दिड वाजता तिथून पाय काढला.
ठिकाणावरून कोणास ताब्यात घेण्यात आलेले नाही. तर आपण संस्थेच्या माध्यमातून कोणताही गैर प्रकार केलेला नसल्याचे आसिफ शेख यांचे म्हणणे आहे. तर पथकाला चौकशीत सहकार्य केले असून, कार्यालयातून प्रचार पत्रके, बॅनर व इतर कागदपत्रे नेण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईसाठी असलेल्या पोलीस सुरक्षेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही.
मोदीं विरोधी भूमिकेने अडचण ?
पीएफआयच्या नेरुळ येथील कार्यालयात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महागाई विरोधातल्या आंदोलनातले पोस्टर आढळून आले आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करा अथवा, खुर्ची सोडा असे संदेश लिहिलेले आहेत. त्याशिवाय इतरही आंदोलन व सामाजिक उपक्रमाचे पोस्टर कार्यालयात आढळून आले आहेत.