दहशतवाद्यांना पैसा पुरविणाऱ्यांवर एनआयएचे छापे; हवालाचे चीन कनेक्शन उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 09:08 AM2023-02-24T09:08:09+5:302023-02-24T09:08:39+5:30
इमिटेशन ज्वेलरीच्या आयात-निर्यातीतील पैसा अतिरेक्यांना
आशिष सिंह
मुंबई - एनआयएने खलिस्तान आणि लॉरेन्स बिश्नोई सिंडिकेटप्रकरणी कारवाई करताना ७६ ठिकाणी छापे टाकले असून, यात मुंबईतल्या आग्रीपाडा भागातील एका घराचा समावेश आहे. याप्रकरणी एका ३५ वर्षीय संशयिताला समन्स देत त्याची गेल्या तीन दिवसांपासून एनआयए टीममकडून चौकशी केली जात आहे. हा संशयित इमिटेशन ज्वेलरीचा व्यापारी आहे आणि तो चीनमधून या ज्वेलरीची आयात व निर्यात करतो. हा पैसा हवालामार्गे अतिरेक्यांना पुरवला जात असल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्या हवाला लिंक संदर्भात दोन संशयितांना रडारवर ठेवण्यात आले होते. यामुळे चंदीगड एनआयएचे पथक मुंबईत पोहोचले. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेसह आग्रीपाडा भागातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटवर छापा टाकला. तिथे चौकशीदरम्यान या पथकाला कळले, की त्यांच्या रडारवर असलेल्या मुख्य संशयिताचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तो इमिटेशन ज्वेलरी व्यवसायाशी संबंधित होता. हे दागिने तो चीनमधून आयात आणि निर्यात करत असे. ही व्यक्ती अनेक गुन्हेगारी कारवायांशी जोडली गेली असल्याने त्यावर पाळत ठेवण्यात आली होती.
एनआयए टीमने त्याच्या मुलाची सहा तास चौकशी केली. त्याचे दोन मोबाइल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. बुधवारी त्याला चौकशीसाठी बोलावले. या चौकशीत इमिटेशन दागिने, आयात-निर्यातीबाबत चौकशी करण्यात आली. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रडारवर असलेले पिता-पुत्र हे इमिटेशन ज्वेलरीशी जोडलेले असून, गोळा केलेली रक्कम बिश्नोई गॅंग आणि गोल्डी बराड यांच्याशी जोडल्या गेलेल्या लोकांना मलेशिया, कॅनडा आणि फिलिपिन्समधून कमिशनच्या आधारावर हवालाद्वारे दिली जात होती. सध्या एनआयए टीम त्यांचा व्यवसाय आणि व्यवहाराशी संबंधित माहिती गोळा करत आहे. दरम्यान, एनआयएने देशभरात ७६ ठिकाणी छापे टाकले असून, आतापर्यंत सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. यातून दोन कोटी ३० लाख रुपये जप्त करण्यात आले, तर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.