NIA ची संशयाची सुई प्रदीप शर्मा यांच्याकडे; जिलेटीनची व्यवस्था केल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 09:50 PM2021-04-08T21:50:48+5:302021-04-08T21:51:38+5:30
Pradip Sharma : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या जिलेटीनबाबत देखील कसून चौकशी केली जात आहे.
मुंबई पोलिस दलातील माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एनआयएच्या चौकशीत अडकले आहेत. शर्मांची आज सलग दुसऱ्या दिवशी चौकशी सुरु आहे. आज दुपारी १. १५ वाजताच्या सुमारास NIA ऑफिसमध्ये पोचले असून अजूनही ९. ३० तास उलटले तरी NIA चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. काल देखील जवळपास साडेसात-आठ तास प्रदीप शर्मा यांची चौकशी NIA ने केली होती. प्रदीप शर्मा यांची सचिन वाझेंच्या केबिनमध्ये मीटिंग झाली होती. एनआयए त्याबद्दल प्रदीप शर्मांना विचारपूस करत आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या जिलेटीनबाबत देखील कसून चौकशी केली जात आहे.
एनआयएने केलेल्या तपासणीत सचिन वाझे यांनी जिलेटिन खरेदी केली असावी असे आढळल्याचे न्यायालयातही म्हटले आहे. ज्या जिलेटिनच्या २० कांड्या अँटिलियाबाहेर स्कॉर्पिओत सापडल्या, त्या नागपूरच्या एका कंपनीतून विकत घेतल्या असल्याचे तपासत निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या जिलेटिनची व्यवस्था प्रदीप शर्मा यांच्याकडून झाली आहे का, याबद्दलही एनआयएकडून विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच सचिन वाझे ३ मार्चला तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटून अंधेरी परिसरात गेले होते आणि तिथे त्यांनी शर्मा यांची भेट घेतली होती अशी चर्चा आहे. त्याचबरोबर अंबानी स्फोटके प्रकरणात ज्या ‘जैश उल हिंद’ दहशतवादी संघटनेने स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्यासाठी देखील प्रदीप शर्मा यांनी वाझेंना मदत केली असा संशय NIA ला आहे.