मूलबाळ नसलेल्या मावशीने केले भाचीचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:54 AM2021-12-27T05:54:12+5:302021-12-27T05:54:40+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात सोनू बाली कुटुंबासह राहत असून त्यांना ६ वर्षांची देविका ही मुलगी आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरात घरासमोर खेळणाऱ्या ६ वर्षांच्या देविका सोनू बाली हिचे अपहरण स्वत:ला मूलबाळ नसलेल्या मावशी व तिच्या पतीने केल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने ४८ तासांत अपहृत मुलीची सुटका केली असून, देविकाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात सोनू बाली कुटुंबासह राहत असून त्यांना ६ वर्षांची देविका ही मुलगी आहे. शुक्रवारी देविका घरासमोर खेळत असताना एक महिला व इसमाने देविकाला रिक्षात घालून नेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. मुलीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळाली नाही. तिची मावशी सरला गणेश मुदलीयार हिच्याशी संपर्क साधला असता तिचा फोन बंद होता. अखेर मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून सोनू बाली यांनी मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली.
याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यावर, शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या पथकाने समांतर तपास करून मावशी सरला मुदलीयार यांच्याकडून अंबरनाथ येथून शनिवारी रात्री मुलीची सुटका केल्याचे पोलीस अधिकारी मांगले यांनी सांगितले.
सरला मुदलीयार हिला मूल नसल्याने, तिने पती गणेश मुदलीयार याच्या मदतीने देविकाचे अपहरण केले होते. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केलेल्या वर्णनावरून पोलिसांना मावशीचा संशय आला होता. शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने माहिती काढून देविकाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सरला व तिचा पती गणेश मुदलीयार यांना अटक करून मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिले.