कोकेनसह एक कोटींच्या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या नायजेरियनला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:24 PM2022-01-31T22:24:02+5:302022-01-31T22:24:33+5:30
Drugs Case : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: अफ्रिकन देशातून मुंबई ठाण्यात विक्री
ठाणे: कोकेन आणि मेफेड्रॉन पावडर (एमडी) या अंमली पदार्थाची मुंबई आणि ठाण्यात तस्करी करणा:या डिक्सन चिडीबेरे इङो (३०, रा. चांदीवली, मुंबई) या नायजेरियन तस्कराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सोमवारी दिली. त्याच्याकडून एक कोटी १२ लाखांचे कोकेनसह अमली पदार्थ हस्तगत केले आहेत.
ठाण्यातील घोडबंदर रोड भागात एक नायजेरियन कोकेनच्या तस्करीसाठी येणार असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्यासह पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर आणि सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकाने २७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी कासारवडवली येथील आनंदनगर नाका येथे सापळा रचून कोकेन आणि एमडी पावडरच्या विक्रीसाठी आलेल्या डिक्सनला ताब्यात घेतले. त्याने अफ्रिकेतून हे कोकेन आणि एमडी भारतात तस्करीसाठी आणल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये २७४ ग्रॅम कोकेन आणि ६० ग्रॅम एमडी पावडर अशा एक कोटी १२ लाखांच्या अंमली पदार्थांसह तस्करीसाठी वापरलेली एक मोटारकार सहा मोबाईल आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एक कोटी १७ लाख ३८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
एका ग्रॅम कोकेनची ४० हजारांमध्ये ठाणो आणि मुंबईत अनेकांना त्याने या अंमली पदार्थाची विक्री केली आहे. त्याच्याविरुध्द कासारवडवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस तसेच फॉरेनर्स अॅक्ट कलम १४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. त्याला १ फेब्रुवारीर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.
तस्करीमध्ये डिक्सन सराईत
डिक्सन हा अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये सराईत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागात २०१७ मध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. यात त्याची जामीनावर मुक्तता झाली आहे.